आव्हाडांनी हात लावल्यावर मला जी फिलिंग आली, ते पोलिसांना सांगितलं; फिर्यादी महिलेचा दावा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता फिर्यादी महिलेने आपली बाजू मांडली आहे. संबंधित महिला ही भाजपची पदाधिकारी असून तिने सोमवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आता अनेकजण म्हणत आहेत की, गर्दीत असे प्रकार घडतात. पण सगळ्यांनाच या गोष्टी चालतात असे नसते. त्या प्रकारानंतर माझ्या मनात जी काही भावना उत्पन्न झाली त्यामुळे मी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे स्षष्टीकरण या महिलेने दिले.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला होते. ते उद्घाटनाची फीत कापायला गेले तेव्हा खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही बाजूला गेलो. साहेब परत जाण्याची वेळ झाली तेव्हा मी त्यांना जाऊन भेटायचे ठरवले. मी त्यांच्या पीएलाही मला साहेबांना भेटायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी मी एका बाजूने एकनाथ शिंदे यांच्या गाडीच्या दिशेने जात होते. तेवढ्यात आमदार जितेंद्र आव्हाड पुढे आले. ते स्थानिक आमदार असल्यामुळे मी त्यांना ओळखते. त्यामुळे समोर आल्यावर मी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बघून हसले.
तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी, 'तू इथे काय करतेयस', असे बोलत मला हातांनी बाजूला ढकलले. त्यांनी मला बाजूला सारताना बाकीचा विचार केला नाही. जितेंद्र आव्हाड यांनी मला जिथे ढकललं तिथे खूप पुरुष होते. त्यामुळे ढकलल्यानंतर मी पुरुषांच्या अंगावर गेले. या प्रकारानंतर मी डीसीपी साहेबांकडे गेले. त्यांना माझ्याकडे असलेला व्हिडिओ दाखवला. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या अंगाला हात लावल्यावर मनात जी भावना उत्पन्न झाली, ते मी पोलीस जबाबात सांगितले. त्याआधारे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, असे संबंधित महिलेने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.