तुम्ही पिस्ता म्हणून शेंगदाणे तर खात नाही?
नागपुरात पिस्ता म्हणून शेंगदाण्याची विक्री
सुक्यामेव्यामध्ये समाविष्ट होणारा पिस्ता आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी पिस्ता फायदेशीर ठरतो. तसं पाहायला गेलं तर, इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा पिस्ता फारच महाग असतो. तुम्हीही हिवाळ्यात सुकामेवा खासकरून पिस्ता खाऊन आरोग्यवर्धन करण्याचा विचार करत असाल, तर थोडं सावध रहा... कारण काही भेसळखोर शेंगदाण्यावर धोकादायक रंग चढवून बाजारात सुक्यामेव्याचा व्यापार करत आहेत. नागपूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत हे सत्य समोर आलं आहे.
मुळतः हिरव्या रंगाचा असणारा, चवीलाही उत्तम असणारा पिस्ता लहानग्यांपासून थोरामोठ्यांना आवडतो. त्याचा चटक रंग पाहून कोणालाही पिस्ता खाण्याचा मोह आवरता येत नाही. हा दिसतो जेवढा आकर्षक तेवढीच याची किंमतही जास्त असते. पण सध्या बाजारात पिस्ता नाहीतर पिस्त्याचं रुप घेतलेले शेंगदाणे फिरतायत. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर काही भेसळखोर शेंगदाण्यांवर धोकादायक रंग चढवून बाजारात पिस्ते म्हणून विकत आहेत.
नागपुरात काही भेसळखोरांनी 70 रुपये किलोचे शेंगदाणे अकराशे रुपये किलोच्या पिस्ताच्या नावाखाली विकण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. नागपूर पोलिसांच्या झोनच्या विशेष पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली. नागपुरातील प्रसिद्ध गणेशपेठ परिसरात एका वाहनातून बनावट पिस्ता नेला जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली आणि ते वाहन येताच थांबवून त्याची तपासणी केली. त्यावेळी तीन पोत्यांमध्ये हिरवेगार पिस्ते आढळून आले. मात्र पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी वाहनचालकानं पोत्यात 120 किलो पिस्ता नाहीतर शेंगदाणा असल्याची माहिती दिली. वाहनचालकाच्या माहितीवरुन पोलिसांनी गोळीबार चौक परिसरात धाड टाकली. त्याठिकाणी बनावट पिस्ता बनवण्याचा कारखाना पोलिसांच्या हाती लागला.
धक्कादायक बाब म्हणजे, गोळीबार चौक भागातील या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर सडक्या शेंगदाण्यावर प्रक्रिया करून पिस्ता बनवला जात होता. त्या ठिकाणी खास मशीनवर शेंगदाण्याचा पिस्टच्या आकारात कापले जात होते. त्यानंतर कापलेल्या शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन वाळवले जायचे. त्यानंतर त्याची बाजारात अकराशे रुपये किलो दराने विक्री केली जायची. त्या ठिकाणचे चित्र पाहून पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते गोळीबार चौकातील त्या कारखान्यात अत्यंत धोकादायक रासायनिक रंग शेंगदाण्याला हिरवा रंग देण्यासाठी वापरला जात होता. असे रंग आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून त्यामुळे कॅन्सर सारखे जीवघेणे रोग होऊ शकतात अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, नागपुरात असा नकली पिस्ता कुठे कुठे विकला जात होता, याचा तपास आता नागपूर पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सुरु केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.