दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांचे वडिल कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन..
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांचे वडिल कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले आहे. हैदराबादमधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते. कृष्णा घट्टामनेनी यांची पत्नी म्हणजेच महेश बाबूच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या गोष्टीचा कृष्णा यांना मोठा धक्का बसला होता. त्या धक्क्यातून ते स्वत:ला सावरू शकले नाहीत. 13 नोव्हेंबरला कृष्णा चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. पण त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कृष्णा घट्टामनेनीयांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.
कृष्णा घट्टामनेनी कोण आहेत?
कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक असण्यासोबत ते राजकारणीदेखील होते. गेल्या पाच दशकांत त्यांनी 350 हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. त्यामुळेच त्यांना 'सुपरस्टार' म्हटले जायचे.1961 साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. करिअरच्या सुरुवातीला छोट्या-छोट्या भूमिका केल्यानंतर 1965 साली 'Thene Manasula' या सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
कृष्णा घट्टामनेनी यांचे दोन लग्न झाले आहेत. 28 सप्टेंबर 2022 रोजी महेश बाबूची आई आणि कृष्णा यांची दुसरी पत्नी इंदिरा देवी यांचं निधन झालं. तर 2019 मध्ये कृष्णा यांच्या पहिल्या पत्नीचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीत काम करणं बंद केलं.
महेश बाबू पोरके झाले...
कृष्णा घट्टामनेनी यांचा मोठा मुलगा रमेश बाबू यांचा 2008 साली एका प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले होते. अशातच आता वडिलांच्या निधनाने महेश बाबू पोरके झाले आहेत. जवळच्या तीन व्यक्तींच्या मृत्यूनंतर ते कोलमडले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.