राहुल गांधी यांचे भावनिक पत्र..
महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला अलोट प्रेम दिले. प्रचंड प्रतिसाद दिला. देशाला पुरोगामी विचारांचा वारसा देणाऱ्या या राज्यातील जनतेचे शतशः धन्यवाद, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आभार मानले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगारीची बिकट समस्या पाहून मन व्यथित झाल्याची खंतही राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून कश्मीरकडे निघालेल्या भारत जोडो यात्रेचे आंध्र भूमीतून महाराष्ट्रात नांदेड जिल्हय़ात आगमन झाले. देगलूर येथे यात्रेचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर हिंगोली, वाशिम, अकोला असा प्रवास करत ही यात्रा बुलढाणा जिल्हय़ात दाखल झाली. जळगाव जामोद येथून ही यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे. मध्य प्रदेशाकडे मार्गस्थ होण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश दिला.
छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गजानन महाराज, साई बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज असा देदीप्यमान विचारांचा वारसा घेऊन आम्ही देशभरात जाणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्षे समता, सामाजिक न्याय तसेच बंधुत्वाची शिकवण दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचा हाच संदेश आहे आणि भारत जोडो यात्राही हाच वारसा घेऊन नम्रपणे पुढे जात आहे. या प्रवासात महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला अपार प्रेम दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
'भारत जोडो' आज मध्य प्रदेशात
भारत जोडो यात्रेने 1800 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील प्रवास पूर्ण करत भारत जोडो यात्रा उद्या बुधवारी मध्य प्रदेशमध्ये पोहचत आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधी या मध्य प्रदेशात राहुल यांचे स्वागत करणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.