14 वर्षाखालील बालके, किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्याचे आढळल्यास कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा
सांगली : बालदिनाचे औचित्य साधून दि. 14 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बालकामगार प्रथाविरोधी सप्ताहाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयामध्ये कोणत्याही आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकास अथवा प्रतिबंधीत उद्योग व प्रक्रियेमध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सांगली यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिकांनी बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 मधील तरतुदी नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे, तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना प्रतिबंधीत उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने/ नियोक्ताने बालकास अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास, त्यांना 20 ते 50 हजार रुपये दंड वा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होवू शकतात, असेही श्री. गुरव यांनी कळविले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.