अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 30, : अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी पंतप्रधानाचा नवा 15 कलमी कार्यक्रमांतर्गत विविध योजनांचा लाभ अल्पसंख्यांक समुदायाला मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक प्रयत्न करावेत व या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी पंतप्रधानाचा नवा 15 कलमी कार्यक्रमांतर्गत कोणकोणती कामे करू शकतो, वित्तीय मर्यादा, प्रस्तावाची पध्दत याबाबतची सविस्तर माहिती समिती सदस्यांना द्यावी. जिल्हा परिषदेकडील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित असलेल्या प्रस्तावाच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. स्थानिक पातळीवर काही अडचण असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी ज्या कामांचे कार्यादेश दिले आहेत त्यातील अटीनुसार काम केले नसल्यास संबंधितांना नोटीस देवून ते काम पूर्ण करण्याबाबत विचारणा करावी. विहीत वेळेत काम पूर्ण न केलेल्यांचा कार्यादेश रद्द करावा व दुसरा कार्यादेश इतरांसाठी द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच महानगरपालिकेने प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत सादर केलेला सदभाव मंडप बाबतचा प्रस्ताव त्यातील त्रुटी दूर करून पुनश्च: समितीसमोर सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी आमदार तथा समिती सदस्य विक्रम सावंत यांनी प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात असे मत मांडून या योजनांतर्गत प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी लावण्याबाबत सूचना केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.