जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराचा पक्षाला घरचा आहेर
सांगली : देशातील आणि राज्यातील सरकार हे अदानींसारख्या भांडवलवादी उद्योगपतींचं असल्याची टीका भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी ही टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
विलासराव जगताप यांच्या या वक्तव्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी जत तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान त्यांनी जत येथील एका ट्रॅक्टर शोरूमच्या उद्घाटनास उपस्थिती लावली. यावेळी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली. हे सरकार अदानी यांच्यासारख्या भांडवलशाही उद्योगपतींचे सरकार असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या माजी आमदाराने भाजपच्याच धोरणावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे .
माजी आमदार विलासराव जगताप यावेळी म्हणाले की, "सर्व क्षेत्रातील घटक बळीराजाचे, शेतकऱ्यांचे शोषण करतात. म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि या सर्व घटकांना पोसण्याचं काम काँग्रेस आणि भाजप सरकार करत आहे."
या आधी अंबानीचं राज्य होतं तर सध्या आदानींचं राज्य सुरू असल्याची खोचक टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. जगताप यांनी केलेल्या या भाषणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या निमित्ताने जगताप यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे का? अशी चर्चा होत आहे. काही दिवसापूर्वी विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यावर देखील माजी आमदार जगताप यांनी टीका केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.