‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव’ या दिवाळी अंकाला राष्ट्रीय प्रथम पुरस्कार प्रदान
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक यांच्या वतीने दिल्या जाणार्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राष्ट्रीय प्रथम पुरस्कार २०२१ या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी कवितासागर प्रकाशन द्वारा मुद्रित आणि प्रकाशित ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ या दिवाळी अंकाची सन्माननीय परीक्षकांनी या वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. दिवाळी अंक ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी, यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी तसेच दिवाळीच्या फराळाबरोबर वाचकांना सकस साहित्याची मेजवानी देणार्या दिवाळी अंकांचा, साहित्याचा गौरव व्हावा यासाठी दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ या दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राष्ट्रीय प्रथम पुरस्कार २०२१ जाहीर करण्यात आला असून यापुढेही अशाच प्रकारचे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करून साहित्यसेवा करावी अशी अपेक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी व्यक्त करून ते पुढे म्हणाले, “सर्वोत्तम अंक निवडण्याचे निकष जात, धर्म, प्रदेश, राजकीय विचारधारा या कोणत्याही बाबींचा विचार करणारे नसून केवळ साहित्य आणि कलामूल्ये यांचाच विचार केला गेला आहे.”
‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव’ हा ५३८ पृष्ठांचा आगळा - वेगळा विशेषांक असून ज्यामध्ये एकही जाहिरात नाही हे विशेष. उत्कृष्ट मांडणी आणि बांधणी असलेला तसेच उत्तम दर्जा असलेला हा दिवाळी अंक आहे. आतील छपाई खूप सुंदर आहे. संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांचे छंदप्रेम आणि वाचनप्रेम यातून प्रकर्षाने जाणवते. इतरांप्रती ते सातत्याने करत असलेल्या कष्टाची जाणीवही यातून दिसते. वाचनप्रेमासाठी संपादक डॉ. सुनील दादा पाटील स्वत: राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या निमित्ताने जगभरातील वाचकांच्यासमोर आली. त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला एक वेगळी उंची आहे. आज डिजिटल - सोशल मिडियाच्या युगात कवितासागर च्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव’ या दिवाळी अंकातून छंदवेड्या व्यक्तींना प्रेरणा मिळाली असून या दिवाळी अंकाचे हे निर्भेळ यश आहे.
नाशिक येथील लायन्स क्लब सभागृहात संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् दीपोत्सव २०२१’ चे मुद्रक, प्रकाशक आणि मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते होणारा विशेष सन्मान त्यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री. ऐनाथ पेन्शनवार आणि सौ. कविता पेन्शनवार यांनी अभिनेत्री प्रिया तुळजापुरकर आणि उद्योजिका कल्पना पांडे यांच्या हस्ते स्वीकारला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.