चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या नावानं Facebook अकाऊंट उघडून पैशांची मागणी
सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन फसवणुकीचे प्रकार आपण ऐकत असतो. अनेकजण या ठगांचे बळी देखील ठरतात. कुणाचंही नाव सांगून किंवा बनावट अकाऊंट बनवून फसवणूक केली जाते हे विशेष. असाच प्रकार समोर आलाय तो केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासंदर्भात. खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पंचायत राज राज्यमंत्रीपद मिळालं आहे. या निमित्त ते देशभरातील अनेक राज्यातील गावपाड्यांना भेटी देत असतात. अशातच त्यांच्या नावाने अज्ञात ठगाने फेसबुकवर अकाऊंट उघडले. आणि त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वतीने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात ठगाविरोधात सायबर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या मंत्री कपिल पाटील यांच्या नावाने बनवण्यात आलेलं हे फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आला आहे.
नारपोली पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्याअंतर्गत अज्ञात ठगाविरोधात तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे नावाने फेक फेसबूक अकाऊंट उघडून अज्ञात ठगाकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात होत्या. विशेष म्हणजे याच फेसबुक अकाऊंटवरून समोरच्या व्यक्तीला ऑनलाईन पैशांची मागणी केली जात होती. अशाच एका तरुणाला मंत्री महोदयांच्या या बनावट फेसबुक अकाऊंटवरून 15 हजार रूपयांची मागणी करण्यात आली. यानंतर हा प्रकार समोर आला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून नारपोली पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्याअंतर्गत अज्ञात ठगाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बनावट फेसबुक अकाऊंटवरून आलेल्या रिक्वेस्ट न स्वीकारण्याचे आवाहन
दरम्यान, त्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून आलेल्या रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत. तसेच कोणीही पैसे पाठवू नयेत. आपल्या बाबतीत असा प्रकार झाला असल्यास तातडीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. पोलिसांनी देखील नागरिकांना आवाहन केले असून सोशल मीडियाद्वारे कोणी ऑनलाईन पैशांची मागणी करत असेल तर पैसे पाठवू नका तसेच तुमचं बनावट अकाउंट कुणी तयार करून असा प्रकार करत असेल तर त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी जेणेकरून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल आणि नागरिकांनी अशा ठगांपासून सावधान राहण्याचे देखील पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.