व्यंकय्या नायडूंनी दिला मोदींना सल्ला; म्हणाले, "विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही."
नवी दिल्ली: माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. त्याचवेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही नियमितपणे भेटण्याचा सल्ला त्यांनी मोदींना दिला.
मोदींच्या भाषणांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन नायडू यांच्या हस्ते झाले. त्या सोहळ्यात बोलताना नायडू यांनी परराष्ट्र धोरण, आरोग्य, तंत्रज्ञान आदी वैविध्यपूर्ण क्षेत्रांत मोदींनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. भारत आता एक शक्ती बनला आहे.
भारताचा आवाज जगभरात ऐकू येत आहे. मोदींनी अतिशय कमी कालावधीत केलेल्या कार्यामुळे ते शक्य झाले आहे. अर्थात, प्रभावी कामगिरीनंतरही मोदींच्या कार्यपद्धतीविषयी काही घटकांचे आक्षेप आहेत. त्यामागे गैरसमज असू शकतात. त्या गैरसमजांचे कारण राजकीय अपरिहार्यताही असू शकते.
कालांतराने ते गैरसमज दूर होतीलही. पण, मोदींनी सत्ताधाऱ्यांबरोबरच सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही भेटायला हवे, असे ते म्हणाले. नायडू यांनी विरोधी पक्षांनाही सल्ला दिला. सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या मनाने जनादेशाचा आदर करायला हवा. राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहेत, असे त्यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.