Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांचे नाव, आता सुप्रिया सुळे म्हणतात...

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांचे नाव, आता सुप्रिया सुळे म्हणतात...


मुंबई: मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव आले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर  यांनी या प्रकरणात शरद पवार  यांचीदेखील चौकशी करण्यात यावी, असे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना पाठवलं आहे. या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज सु्प्रिया सुळे यांनी किन्नर माँ एक सामाजिक संस्था ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, 'जे आरोप करत आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात काही कागदपत्रं आहेत का? ईडीचे कागदपत्रे लीक होत असतील, तर ही देशासाठी अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे मी या संदर्भातील देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेऊन चर्चा करणार आहे. मला देशाची चिंता आहे,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शरद पवारांवर काय आरोप?

मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भाजपने शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी बैठका घेत होते. शरद पवार हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर असून, त्यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.