उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेत संजय राऊतांच्या नावाची खुर्ची
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची आज पहिलीच जाहीर सभा गोरेगावमध्ये होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेमध्ये एक खुर्ची सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही, यावर अद्याप स्पष्टता नसली तरी, दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी ही सभा आयोजित केली आहे. एकनाथ शिंदेंनी फोडलेले आमदार, भाजपाने खेळलेला डाव आणि महापालिका निवडणुकीबरोबरच ठाकरे नुकत्याच झालेल्या फॉक्सकॉन पळवापळवीवर देखील बोलण्याची शक्यता आहे.
अशातच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत हे ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहे. असे असताना आजच्या सभेच्या व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खूर्ची दिसल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. संजय राऊत तुरुंगात असताना ते सभेला कसे येतील, असा सवाल विचारला जात आहे. असे असले तरी शिवसेनेची राऊतांच्या नावाची खूर्ची ठेवून शिवसैनिकांमध्ये वेगळाच संदेश देण्याची खेळी असल्याचे समजते आहे. संजय राऊत तुरुंगात असले तरी आम्ही त्यांची साथ सोडणार नाही, असा संदेश देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊत यांच्यामुळेच सत्ता गेल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. राऊत यांच्यामुळेच भाजपा आणि शिवसेनेत अंतर वाढत गेले, तसेच राऊत हे पवारांचे एजंट असल्याचेही आरोप झाले होते. राऊत यांच्या या वागण्याला कंटाळूनच आपण ठाकरेंशी फारकत घेतल्याचे एक कारण शिंदे गटाकडून देण्यात येत होते. तरी देखील ठाकरेंनी व्यासपीठावर पहिल्या रांगेत राऊतांची खूर्ची ठेवली आहे, भर सभेत ही खूर्ची रिकामीच दिसणार आहे. यातून जनतेला वेगळा संदेश दिला जाणार आहे.
पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्न
एकेकाळी खांद्याला खांदा लावून ठाकरे, शिंदे आणि फडणवीस काम करत होते. पण आता ठाकरे विरुद्ध सारे असे चित्र तयार झाले आहे. गटप्रमुखांचा मेळावा म्हणजे पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल, असे म्हटले जात आहे. बंडानंतर अनेक कार्यकर्ते, नेते हे शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिवसैनिकापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. शिंदे सरकारच्या विरोधात एल्गार करुन आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलेय. ही लढाई पुढे घेऊन जायचे काम आता उद्धव ठाकरे करणार असल्याचे सांगितले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.