एकनाथ शिंदेंनी वाढवला सस्पेन्स!
जळगाव, 20 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात झालेल्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे.
हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, 200 क्रॉस झाले तरी आश्चर्य वाटायला नको, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भविष्यात महाराष्ट्रात काय होणार आहे, याबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 'मला इतकं प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. रस्त्याच्या दुतर्फा असलेले लोक बघून आमचा निर्णय चुकला का बरोबर आहे, हे तुम्हीच सांगा.
काल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला मोठं यश मिळालं. ज्यांनी आम्हाला अडीच वर्ष घरी बसवलं त्यांना लोकांनी घरी बसवलं,' असं टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवायला निघाली आहे, हे आम्ही वारंवार सांगत होतो. ही चूक दुरूस्त करायला सांगत होतो. गुलाबराव पाटीलही हेच सांगत होते, पण झोपेचं सोंग करणाऱ्यांना कसं समजणार? आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो, मग भाजपसोबत जायलं हवं होतं ना? मग सांगा गद्दार कोण? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला.
'अडीच वर्षात त्यांनी जितकी कामं केली तितकी आम्ही अडीच महिन्यात केली. मी बाहेर फिरलो म्हणून यांना आता फिरावं लागत आहे. यांना दोन मुख्यमंत्री हवे होते, कारण त्यांना सवय नव्हती. गुलाबराव पाटील तोफ आहेत. शिवाजी पार्कवर जेव्हा ते बोलायचे तेव्हा लोक उत्सफूर्त उठायचे. त्यांचं भाषण थांबवलं जात होतं, कारण त्यांना क्रेडिट मिळत होतं. गुलाबरावाचं भाषण कट का केलं?', असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. 'गुलाबरावांनी बाळासाहेबांची शिवसेना फुलवली, त्यांना काटे टोचण्याचं काम यांनी केलं.
पान वाला, टपरीवाला म्हणून हिणवलं. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे तुम्हाला पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं काय. इतके लोक नेले, हा अभद्र युतीविरोधातला उठाव होता,' असं शिंदे म्हणाले. 'दोन वर्षात इतकं काम करू की औषधालाही कोणी उपलब्ध राहणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे नेत आहोत, म्हणून हैदराबादमध्येही आमचं स्वागत होतं. 200 क्रॉस झाले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. गुलाबरावनी गद्दारी केली नाही, खोके बिके घेतले नाही,' असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.