Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माता व बाल मृत्यू शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

माता व बाल मृत्यू शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे


- माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा लाभ घेऊन सर्व महिलांनी आरोग्याची तपासणी   करून घ्यावी 

- आरोग्य ‍विभागास आवश्यक निधी उपलब्ध करून देवू


सांगली, दि. 26,  :  स्वत:पेक्षा आपल्या कुटूंबाची जास्त काळजी घेत असताना महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिला सुदृढ असल्यास कुटुंब, समाज, गाव व देश सुदृढ होतो. त्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा लाभ घेऊन सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. यासाठी आरोग्य ‍विभागास आवश्यक निधी उपलब्ध करून देवू. आरोग्य विभागाने माता व बाल मृत्यू  शुन्य टक्के करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने शायकीय वैद्यकीय महाविद्यालय व  रूग्णालय मिरज येथे  माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान व स्मार्ट पीएचसी अंतर्गत आरोग्य तपासणी आणि जनजागृती शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, महिलांनी त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी. तपासणीनंतर उपचाराची आवश्यकता पडल्यास त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.  वेळीच निदान व उपचार केल्यास मृत्यू टाळता येतील. महिला ज्या प्रमाणे  कुटुंबाची काळजी घेतात त्या प्रमाणेच त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अत्यंत सुंदर असल्याचे ते यावेळी म्हणाले. 

खासदार संजय पाटील म्हणाले, आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेला माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जावून सर्व्हे करून डेटा हाती आल्यानंतर उपचारासाठी वेगवेगळ्या फंडातून मदत करण्यासाठी प्रयत्न करू.  राज्याला व देशाला आदर्श देण्याचे काम जिल्हा करेल. वेगवेगळे उपक्रम हाती घेवून यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी सहकार्याची भूमिका बजावतील, असे ते यावेळी म्हणाले.


जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, घराचा पाया महिला आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही मोहिम सुरू आहे.  आरोग्याचा मुळ आधार पोषण हाच आहे. त्यामुळे महिलांनी त्यांच्या पोषणावरती जास्त भर देणे गरजेचे आहे. पोषणामध्ये आयर्न (लोह) हा घटक महत्वाचा आहे. आयर्न वाढविण्यासाठी योग्य रितीने जेवण करावे. सकाळी उठल्यापासून 30 ते 40 मिनीटांमध्ये काही तर खावे, यामध्ये कोणतेही एक फळ, केळी घेतली तरी चालेल. गरोदर मातांनी फळे खावीत. खाद्यपदार्थामध्ये आयर्न जास्त असले पाहिजे. त्यासाठी हिरवा भाजीपाला जेवणामध्ये घ्यावा. गुळामध्ये प्रोटीन व आयर्न असते. पत्तागोबी, फुलगोबी, मासांहार, डाळी, अख्खा मसूर मध्ये आयर्न भरपूर आहे. गरोदर मातांनी आयर्न कमतरता टाळण्यासाठी त्यांना देण्यात येणारी आयर्न गोळी घ्यावी. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात सर्व घरामध्ये तपासणी होणार आहे. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. किमान तीन महिन्यातून एकदा आपला रक्तदाब, 30 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांनी शुगर, हिमोग्लोबीन या तीन प्रकारच्या तापसण्या वर्षात किमान चार वेळा कराव्यात. सर्वांनी आरोग्यावर लक्ष द्या. ही मोहिम यशस्वी करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी माता सुरक्षित तर घर सुरक्षित व स्मार्ट पीएचसी अंतर्गत आरोग्य तपासणी मोहिमेबाबत सविस्तर माहिती देवून ते म्हणाले, सुदृढ समाजासाठी महिलांचे आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. महिला निरोगी रहावी, जागरूक व्हावी आणि समाजात तिच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी नवरात्र उत्सव दरम्यान माता सुरिक्षत तर घर सुरक्षित या आरोग्य तपासणी उपक्रम मातृत्वाचा सन्मान हाच आपला अभिमान आदरयुक्त भावनेतनू सार्वजनकि आरोग्य विभागाच्यावतीने महिलांसाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 दरम्यान माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 185 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा करून देणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. 18 वर्षावरील अविवाहित महिला, विवाहित महिला (ज्यांना अपत्य नाही), विवाहित महिला (ज्यांना 1 व 2 अपत्यावरील असेलेले), 30 वर्षावरील सर्व महिला व पुरूष यांचे उंची आणि वजनाचे मोजमाप, हिमोग्लोबीन, मधुमेह, रक्तदाब, रक्त गट आणि असंसर्गजन्य आजार अंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच शून्य ते 18 वयोगटातील मुला-मुलींची घरोघरी जावून तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातून दर्जेदार सेवा देण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.


पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान व स्मार्ट पीएचसी अंतर्गत आरोग्य तपासणी आणि जनजागृती शुभारंभ फित कापून करण्यात आला. तसेच स्मार्ट पीएचसी जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन मोनिका करंदीकर यांनी केले. आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी मानले. या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गरोदर माता, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.