शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची मुलगी शिंदे गटात, ठाकरेंना आणखी एक धक्का
मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष सुरु असतानाच ठाकरे आणि शिंदे गटात अनेकांचा प्रवेश सुरु आहे. काही जण शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत तर काही जण ठाकरे गटाच्या पाठिशी असल्याचं म्हणत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे पहिले आमदार दिवंगत वामनराव महाडीक यांच्या सुकन्या हेमांगी वामनराव महाडीक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक जण त्यांना पाठिंबा देत आहेत. कालच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली म्हणून ओळखले जाणारे थापा म्हणजे चंपासिंह थापा यांनी देखील एकनाश शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता.
कोण आहेत शिवसेनेचे पहिले आमदार?
20 ऑक्टोबर 1970 रोजी शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक विधानसभेवर निवडून गेले होते. कम्युनिस्ट नेते आमदार कृष्णा देसाई यांची 5 जून 1970 साली हत्या झाली होती. देसाई यांच्या हत्येनंतर परळच्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई आणि शिवसेनेकडून वानराव महाडिक यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणुकीत वामनराव महाडिकांनी 1679 मतांनी विजय मिळवला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली होती. पण आता ती शिवसेनेत फूट पडली आहे. 1967 साली शिवसेनेने ठाणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागाही जिंकल्या. त्यानंतर शिवसेनेने अनेक महापालिकांवर भगवा फडकवला. वामनराव महाडिक यांना 31 हजार 592 मतं मिळाली होती तर सरोजिनी देसाई यांना 29 हजार 913 मते मिळाली. या अटीतटीच्या लढाईत शिवसेनेचा भगवा फडकला. यानंतर शिवसेनेने दिवाळी साजरी केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.