चीनमध्ये राजकीय भूकंप?, राष्ट्रपती शी जिनपिंग नजरकैदेत?
शांघाय: चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची सोशल मीडियात जोरदार अफवा आहे. शी जिनपिंग हे नुकतेच उज्बेकिस्तानच्या समरकंद एससीओ समिटमध्ये सहभागी झाले होतो. तेव्हाच त्यांना लष्कराने राष्ट्रपतीपदावरून हटवण्यात आले, असा दावाही सोशल मीडियातून केला जात आहे. तर चीनी कम्युनिस्ट पार्टी आणि सरकारी मीडियानेही याबाबतचं अजून खंडन केलेलं नाही. त्यामुळे या संशयात अधिकच भर पडली आहे. त्यातच भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही ट्विट केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची बातमी सोशल मीडियावरून जोरदार व्हायरल झाली आहे. त्यानंतर ट्विटरवर # XiJinping या नावाने हॅशटॅग सुरू झाला आहे. या हॅशटॅगवरून हजारो लोक ट्विट करत आहेत. त्यातच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केल्याने आणखीनच तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. शी जिनपिंग बीजिंगमध्ये नजरकैदेत असल्याची चर्चा आहे. या अफवेची चौकशी केली गेली पाहिजे, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केलं आहे.
चीनबाबत एक नवीन अफवा आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. शी जिनपिंग नजरकैदेत आहेत का? जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये होते असं सांगितलं जातं. तेव्हा चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी त्यांना लष्कराच्या अध्यक्षपदावरून हटवलं. त्यानंतर त्यांना हाऊस अरेस्ट केल्याची जोरदार अफवा आहे, असं स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडीओही जारी केला आहे.
चीनच्या सोशल मीडियातील काही यूजर्सनीही जिनपिंग नजरकैदेत असल्याचा दावा केला आहे. तसेच चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने त्यांना राष्ट्रपतीपदावरून हटवल्याचा आणि सर्व सत्ता आपल्या हातात घेतल्याचाही दावा केला जात आहे. दरम्यान, ली कियाओमिंग हे चीनचे नवे राष्ट्रपती बनले असल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, या बातमीला कोणीही अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी मात्र या निव्वळ गप्पा असल्याचं म्हटलं आहे. चीनच्या बातम्या देणाऱ्या ग्लोबल टाईम्स, सीएएन आणि बीबीसी सारख्या वृत्तवाहिन्यांनीही याबाबत कोणतीही पृष्टी केलेली नाही.
या आठवड्यात चीनमध्ये दोन माजी मंत्र्यांना मृत्यूदंडाची आणि चार अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या लोकांची एका राजकीय गटाशी हातमिळवणी होती असं सांगितलं जातं. सध्या कम्युनिस्ट पार्टीचं भ्रष्टाचार विरोधी अभियान सुरू आहे. हे अधिकारी आणि मंत्री जिनपिंग यांच्या विरोधी होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.