Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कराडच्या कार्यक्रमामुळे सुचले तेवढे...!

 कराडच्या कार्यक्रमामुळे सुचले तेवढे...!



१७ सप्टेंबरला कराडला गेलो होतो. जाता -जाता आधी पुण्यातील एम. आय. टी. च्या छात्र संसद परिषदेलाही थोडावेळ हजर राहिलो. तो विषय शेवटी सांगतो. कराडला जाण्याचा विषय होता.... 

‘स्व. पी. डी. पाटील स्मृतिदिनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचा कार्यक्रम’. महाराष्ट्रात काही व्यक्तीमत्त्वे अशी आहेत की, त्यांच्या पूर्ण नावाची गरज नाही. सलग ४२ वर्षे कराडचे नगराध्यक्ष असलेले पी. डी. यांचे आडनाव पाटील असले तरी संपूर्ण पश्चिम महारष्ट्रात ते ‘पी. डी.’ नावानेच ओळखले जातात. त्यांच्या मूळ नावाने म्हणजे पांडुरंग दादासाहेब पाटील, मु. पो. कराड, या पत्त्यावर पत्र टाकले तर पोस्टमन ते पत्र कदाचित परत आणेल... पण नुसते पी. डी., कराड एवढे म्हटले तरी ते त्यांच्या घरी पोहोचेल.  पुण्यात पिंपरी- चिंचवडच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाचे आमचे पी. डी. पाटील असेच ‘पी. डी. सर’ नावाने प्रसिद्ध आहेत. राजकारणातील ख्यातनाम एस. एम. जोशी यांचे नाव श्रीधर महादेव जोशी, हे अनेकांना माहितीही नसेल. जोशी आडनावाचीही गरज नाही, ‘एस. एम.’म्हटले म्हणजे, एस. एम. जोशीच. एन. डी. पाटील यांचेही तसेच.... ‘एन. डी.’ म्हटले की त्यात पाटील आलेच... साहित्यामध्येसुद्धा देशपांडे आडनावाची गरज नाही. ‘पु. ल.’ म्हटलं की, त्यात देशपांडे आलेच... ‘व. पुं.’ साठी काळे म्हणण्याची गरज नाही. साहित्यात, राजकारणात काही व्यक्तीमत्त्वे अशी घराघरापर्यंत आद्याक्षराने पोहोचलेली असतात. कराडचे पी. डी. तसेच... सलग ४२ वर्षे नगराध्यक्ष. गिनीज बुकात त्यांची नोंद झाली. अनेक विरोधी नगरसेवक असताना २५ वर्षे कराड नगरपरिषदेत सर्व ठराव एकमताने मंजूर. ३ वेळा कराडचे आमदार. त्यात यशवंतराव चव्हाण यांना जेव्हा संरक्षण मंत्री म्हणून पंडित नेहरू यांनी दिल्लीला बोलावून घेतले... त्यावेळी चव्हाणसाहेबांची लोकसभेवर नाशिकमधून बिनविरोध निवड झाली. चव्हाणसाहेबांच्या उत्तर कराडमधील खाली झालेल्या  आमदार पदासाठी  पी. डीं. ना तिकीट दिले. आणि सलग तीन वेळा ते आमदार झाले. मुंबई आणि पुण्यानंतर नगरपरिषदेच्या हद्दीत ‘भुयारी गटार योजना’ फक्त कराडमध्ये झाली. तीही ५० वर्षांपूर्वी. कराडमधील सगळे रस्ते उत्तम झाले ते पी. डी. अध्यक्ष असतानाच्या काळात. कराडमध्ये यशवंतराच चव्हाणांनी आग्रह करून सह्याद्री सहकारी साखर कारखाना उभा करून घेतला तो पी.डी. यांच्याकडून. 

चव्हाण साहेबांच्या पश्चात कराडमध्येच ‘यशवंतराव चव्हाण महाविद्यालय’ आणि बाजुलाच ‘वेणूताई चव्हाण महाविद्यालय’ उभे राहिले ते पी. डी. यांच्यामुळेच. वेणूताई चव्हाण संग्रहालय उभे राहिले ते पी. डी. यांच्यामुळेच. यशवंतराव चव्हाण सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना स्वत:चे घर नव्हते. (आज हे कोणाला खरे वाटणार नाही. ) पी. डी.ंनी पुढाकार घेवून यशवंतराव यांना कराडमध्ये छोटेसे घर बांधून दिले. ते घर आज तीर्थक्षेत्र झाले आहे. त्या घराचे नाव यशवंतराव यांनी ठेवले ‘विरंगुळा...’ यशवंतरावांनी प्रदेश काँग्रेसचे मासिक काढले त्याचे नाव ठेवले ‘शिदोरी’. प्रत्येक नावाला काही अर्थ आहे. त्यावेळच्या नेत्यांच्या वागण्या- बोलण्याला जसा अर्थ होता. पी. डी. पाटील हा ही असाच नेता.... कमी बोलायचा.... पण, झपाट्याने काम करून दाखवायचा... कृष्णा-कोयना संगमावर आज यशवंतराव चव्हाण यांची जी समाधी आहे, त्याचे रचनाकार पी. डी. पाटील. हा एक अपूर्व संगम आहे.  दोन्ही नद्या महाबळेश्वरच्या डोंगरातून येतात आणि कराड येथे मिळतात. याच संगमावर यशवंतराव लहानाचे मोठे झाले.  त्यांच्या समाधीसाठी इतकी चांगली जागा पी. डी.ं यांनी शोधली की, यशवंतरावांच्या संपूर्ण जीवनाचे सूत्र त्या समाधीस्थळावर उभे राहिल्यावर लक्षात येते. कोयना कृष्णेत मिळते.... आणि कृष्णा कोयनेत मिळते.... दोन नद्यांचा संगम होतो तेव्हा दोन्ही नद्यांना आपले ‘मी’पण विसरावे लागते.  

नद्यांच्या संगमाप्रमाणेच राजकारणातही अनेकवेळा ‘मी’पण विसरावे लागते. यशवंरावांच्या समाधीवर उभे राहिले की,  हा संगम किती वेगळ्या अर्थाचा आहे.... ते जाणवते. पी. डीं.नी ही समाधी इतकी छान बांधली आहे की, समाधी नदीच्या पात्रापासून खूप उंचावर आहे. कराडला अनेकवेळा पूर आले.... काही वेळा समाधीपर्यंत पाणी आले.... पण समाधी सुरक्षित राहिली. त्याचे श्रेय पी. डी. यांच्या दूरदृष्टीला....  अशा या पी.डी. यांच्या स्मृतिदिनाला गेली १६ वर्षे ‘कराड भूषण’ आणि ‘महाराष्ट्र  भूषण’ हे पुरस्कार दिले जातात.  आतापर्यंत खूप मोठ्या बुद्धिवंतांना हे पुरस्कार दिले. त्यात माशेलकर आहेत... काकोडकर आहेत... अभय बंग आहेत.... प्रकाश आमटे आहेत.... या वर्षीचा पुरस्कार ‘भारती विद्यापीठा’चे कुलपती डॅा. शिवाजीराव कदम यांना दिला गेला. स्व. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची निर्मिती केली. ५० वर्षांपूर्वी पुण्यात, कसबा पेठेत, रहाळकरांच्या माडीवर दहा x दहाच्या खोलीत त्यांनी शिकवणीचे वर्ग सुरू केले. विषय होते दोन... ग्रामीण भागातील मुले इंग्रजी आणि गणित या दोन विषयांत कच्ची राहतात... हे हेरून पतंगरावांनी हा व्याप केला. पतंगराव आणि शिवाजीराव हे दोन्ही बंधू गरीब कुटुंबातील. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून दोघेही उच्च विद्याविभूषित झाले. पतंगराव राजकारणात आले.... मंत्री झाले.... प्रदेश काँग्रेसचे खजिनदार झाले.  मनानेही खूप मोठा माणूस.  पण, भारती विद्यापीठाचा एवढा प्रचंड पसारा उभा करताना, त्यांच्या मागे जणू ‘शिवाजी महाराज’ उभा होते. स्वत: शिवाजीराव रसायन शास्त्रातील एम. एस. सी. शिवाय त्याच विषयाचे ते 

पी. एच. डी. पुण्याच्या फार्मासि्टकल कॉलेजचे २५ वर्षे प्राचार्य. भारतीय विद्यापीठात ‘प्र-कुलगुरू’... नंतर कुलगुरू... आणि आता कुलपती.... पतंगराव राजकारणात लोकांसमोर दिसत होते. शिवाजीराव दिसत नव्हते. प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याने १०,००० धावा जेव्हा पूर्ण केल्या तेव्हा त्याचे अभिनंदन करताना त्याने अगदी शांतपणे सांगितले होते की, माझ्या यशाचे सगळे श्रेय माझे गुरु रमाकांत आचरेकर सर आणि माझा भाऊ अजित याला आहे. हे सांगायलाही मनाचे मोठेपण लागते. नांदेड येथे एका कार्यक्रमात मी पतंगरावांना सहज म्हणालो होतो.... ‘पतंगराव, एका खोलीतल्या शिकवणी वर्गातून तुम्ही विद्यापीठ उभे केलेत.... सोपी गोष्ट नाही... ’ खांद्यावर हात टाकून ते हळूच म्हणाले, ‘अरे मित्रा, मी नावाला आहे.... पण, माझा शिवाजी त्यासाठी लढत आहे, राबत आहे... म्हणून विद्यापीठ होऊ शकले....’

काही माणसे लांबून लहान वाटतात. पण, जवळ गेल्यानंतर त्यांचे मोठेपण कळते. काही माणसे जवळून खूप मोठी वाटतात. पण लांबून त्यांचे लहानपण जाणवते.  शिवाजीराव लांबून लहान वाटायचे.... पण हा फार विलक्षण आणि मोठा माणूस आहे.... शिक्षणशास्त्री आहे. नावाचा पुरस्कार करताना, विज्ञानाचा पुरस्कार करताना, ज्ञानाचा प्रसार होत असताना, सर्वत्र शाळा- महाविद्यालये मोठ्या प्रमाणात उभी राहत असताना गूगल, कॉम्पुटर, अॅानलाईन, अशा विविध पद्धतीने वैज्ञाानिक शिक्षक निर्माण झाले असताना,  त्यांचा साधा प्रश्न आहे..... ‘गुणवत्तेचे काय?’ अशा या शिवाजीरावांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘आता कोणाच्या शिफारशीने तरुणांना नोकरी मिळणार नाही’. गुणवत्तेशिवाय पर्याय नाही. प्रचंड स्पर्धा आहे... या स्पर्धेत टिकायला आणि शहरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध साधनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला फार मोठी झूंज द्यावी लागणार आहे. त्यासाठी नवीन शिक्षण व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे.’

अशा या शिवाजीरावांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला गेला. मी त्यादिवशी त्यांना म्हणालो, ‘शिवाजीराव, तुमचे बंधू पतंगराव महाराष्ट्राला मािहती होते.... ते भारती विद्यापीठामुळे.... राजकारणामुळे.... मंत्री असल्यामुळे.... आणि ते लोकांमध्ये मिसळणारे असल्यामुळे.... अता ते नाहीत.... विलासराव देशमुख, आर. आर. आबा... गोपिनाथ मुंडे, पतंगराव ही विविध राजकीय मतांची कर्तृत्त्ववान माणसं... अकाली गेली. चटका लावून गेली. आजही त्यांची आठवण होते. आता तुम्ही विद्यापीठाचे काम खूप मोठे केले आहे.... तुम्ही आता भारती विद्यापीठातून बाहेर पडा.... महाराष्ट्रभर फिरा... राजकारणाखेरिज खूप क्षेत्रे अशी आहेत.... जिथं नेतृत्त्व नाही. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या....’ ते फक्त हसले... का ते समजले नाही... पण, राजकारणात खूप गर्दी झाली असताना, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांचे नेतृत्व करणारे आज महाराष्ट्रात कोण आहेत?

कराडचा कार्यक्रम छान झाला.... सभागृह भरगच्च होते. पी. डी. यांचे सुपूत्र बाळासाहेब पाटील (माजी सहकार मंत्री) यांनी पी. डी. यांचे सगळेच काम आणखीन मोठे केले आहे. पण, एक महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आज आहे.... यशवंतराच च्ाव्हाण यांची समाधी अत्यंत सुरक्षित आहे.... पण, राजकीयदृष्ट्या यशवंतराव यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र तेवढा सुरक्षित वाटत नाही. चारही दिशांनी विचित्र आक्रमणे त्यावर होत आहेत. धार्मिक उन्माद वाढत आहे... जात-धर्माच्या भिंती उभ्या राहत आहेत.  समाजमाध्यमे भलत्या विषयांकडे महाराष्ट्राला घेवून जात आहेत. कष्टकऱ्यांचे मुख्य प्रश्न बाजूला पडलेले आहेत. महागाई, बेरोजगारी आणि महाराष्ट्राची उसवलेली सामाजिक बांधणी.... ही सगळी आव्हाने आज समोर दिसत आहेत. पूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, अशी तक्रार व्हायची म्हणून त्यांचा पक्ष फुटला म्हणतात... आताच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आता सगळेच बोलत आहेत की,  ते नुसतेच भेटी-गाठी करत आहेत. दहीहंडी संपली, गणपती आटोपलेत... आता नवरात्री येईल.... मग पुन्हा भेटी-गाठी...  मग दिवाळी.  येणाऱ्या दिवाळीत मुंबईभर रोषणाईची करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनीच केली आहे.  चांगले आहे... दीप उजळलेच पाहिजेत... पण, मुंबईत लखलखाट आणि ग्रामीण भागात रखरखाट, एवढे होणार नाही, याची काळजी घ्या.  मुंबईत दिवाळी साजरी करायला आणि रोषणाई करायला बरेच पैसेवाले आहेत...  ग्रामीण भागात कष्टकऱ्याच्या घरातील पणतीत सांजवात लावण्याइतपत त्याला योग्य दरात तेल मिळेल, एवढी काळजी तरी घ्यायला हवी. आज तसेही काही लक्षण दिसत नाही.  

परवा दोन चारोळ्या खूप छान प्रसिद्ध झाल्या.... महाराष्ट्रात येणारा ‘वेदांत बॉस्को’ प्रकल्प गुजरातमध्ये गेला म्हणून सरकारवर खूप टीका सुरू आहे.... सगळेच गुजरातमध्ये जाणार आहे. मुंबईच्या बी. पी. टी. चे महत्त्व कमी झालेलेच आहे. रिझर्व्ह बँकेचा एक गव्हर्नर आता दिल्लीत गेला आहे... हा प्रकल्प गेल्याबद्दल टीका होत असताना रामदास फुटाणे यांनी छान चारोळी लिहिली... 

‘मिशीला पीळ देत ते म्हणाले...

‘वेदांत’पेक्षा मोठ मोठे 

तुमच्याकडे येतील

प्रदूषणाचे महाराष्ट्रात 

बाकीचे गुजरातला जातील’

......................

दाढी खाजवत हे म्हणाले....

‘आमच्या दृष्टीने खर तर

हाच खर संकल्प आहे....

पन्नास आमदारांचं पुनर्वसन

हाच मोठा प्रकल्प आहे....’

‘शिवनेर’चे संपादक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी तर रविवारची सकाळ धम्माल करून टाकली.... चारच ओळी टाकल्या... 

प्रत्येक ‘ईडी’ग्रस्ताने

आता एकच करावे

होताच बाधा ईडीची

हाती ‘कमळ’ धरावे.

सध्याच्या राजकारणात अशा गंमती-जमती खऱ्या अर्थाने ‘विरंगुळा’ ठरतात. राजकारण शत्रूत्त्वाने घ्यायचे नसते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अलिकडे अशा सगळ्याच गोष्टी विचित्र झाल्या आहेत. त्यामुळे आमदारच गोळीबार करत आहेत. धक्का-बुक्की होत आहे.... जे पूर्वी कधी झाले नाही. तेच सगळे काही चालू आहे. अशा या राजकारणात कराडला झाले तसे कार्यक्रम जुन्या महाराष्ट्राची आठवण करून देतात.... महाराष्ट्राची बांधणी कशी केली पाहिजे, याचीही त्यानिमित्ताने चांगलीच चर्चा झाली. खासदार श्रीनिवास पाटील छान बोलले. 

लोकशाहीत लोकच शेवटी सर्वश्रेष्ठ अहेत. सर्वोच्च न्यायालायपेक्षाही लोक न्यायालय फार श्रेष्ठ आहे. बहुमत कोणाकडे द्यायचे.... याचा निर्णय शेवटी लोक करतात. लोकांनी दिलेला निर्णय विरोधकांना मान्य करावा लागतो. पण, सत्तेवर बसलेल्यांनी विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा लोकशाहीत बसू शकत नाही. ‘लोकतंत्र’ किंवा ‘प्रजा-तंत्र’ हे हिंदीतले शब्द फार प्रभावी आहेत.... कोणता पक्ष नेस्तनाबूत करू.... कोणत्याही राज्यात विरोधी पक्ष शिल्लक ठेवणार नाही... हे जरा जास्त  चालले आहे. अफाट सत्ता हातात असल्याने असेल कदाचित. पण, मग सर्वश्रेष्ठ असलेले मतदार योग्य निर्णय करतातच. याच्यावर ज्यांचा विश्वास असेल. तेच लोकशाहीचे खरे समर्थक आहेत. दमदाटीने, हिंसेने, अराजकाने जगात कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. पहिले-दुसरे महायुद्ध झाल्यानंतरही प्रश्न सोडवताना चर्चाच करावी लागली. आज देशात ते वातावरण नाही. विरोधकांना शत्रू समजले जात आहे. सामान्य माणसाचा मताचा अधिकार किती प्रभवी आहे, हे अनेकवेळा स्पष्ट झालेले आहे. सध्या भाजपाकडे बहुमत आहे... हे कोणीच अमान्य करत नाही. पण, लोकशाहीत सत्तेचा  अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो, हेही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून प्रश्नांची चर्चा व्हायला पाहिजे. विरोधकांच्या खांद्यावर हत टाकून चर्चा व्हायला पाहिजे. किंवा विरोध संपला की, खांद्यावर हात टाकून संसदेत किंवा विधानसभेतील कॅण्टीनमध्ये चहा प्यायला खांद्यावर हात टाकून जाता आले पाहिजे.  हा मोकळेपणा महाराष्ट्राच्या राजकारणात ५० वर्षे जपला गेला होता. तो आता पूर्णपणे उखडला गेला आहे. त्यामुळे यशवंतरावांची समाधी सुरक्षित असताना महराष्ट्र सुरक्षित आिण सुसंस्कृत वाटत नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी आहे. कराडच्या कार्यक्रमात या विषयाची चांगली चर्चा झाली. असे कार्यक्रम त्यामुळेच महत्त्वाचे ठरतात. पुरस्कार हे निमित्त असते. 

कराडला जाताना पुण्याच्या एम. आय. टी. मधील ‘छात्र संसद’ १२ व्या अिधवेशनाला मुद्दाम गेलो. एम. आय. टी. चे राहुल कराड यांनी १२ वर्षे  हा चांगला उपक्रम राबवला. उद्देश असा की, राजकारणात सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण प्रामुख्याने आले पाहिजेत. त्यासाठी त्यांचे प्रबोधन या छात्र संसदेत १२ वर्षे होत आहे. मोठ-मोठे वक्ते येतात... भाषणे करून निघून जातात. पण आता वेळ अशी आली आहे की, १२ वर्षांनंतर हाती काय आले? त्याचे अॅाडीट झाले का? १२ वर्षांपूर्वी पहिल्या छात्र संसदेला उपस्थित असलेल्या किती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी तरुण राजकारणात आले? शिवाय इथं होणारी भाषणं एका सुरातील आहेत... देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने समारोप झाला... त्यांनी ‘भ्रष्टाचाऱ्यांना मतं देवू नका’, असे सांगितले... आज राज्याराज्यात विविध पक्ष फोडून जी सरकारे निर्माण केली जात आहेत... ते फुटणारे आमदार नेमके कोण आहेत? कोणत्या आदर्शाने, निष्ठेने त्यांनी पक्ष सोडले.... सत्ताधाऱ्यांना जवळ केले? सत्ता मिळवल्या.... ते गंगेत न्हाऊन शुद्ध झालेले आहेत का? हातात तुळशीपत्र घेऊन त्यांचे परिवर्तन झाले का? लोकांना एवढं मूर्ख समजू नका.... श्री. देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य त्यांच्यावरच उलटणार आहे. म्हणून राहूल कराड यांना सांगणे आहे की,  छात्र संसद एकतर्फी होऊ देऊ नका. शिवाय त्याचे अॅाडीट करा... नाहीतर तुम्हाला पुढे असे दिसेल की, एकही गुणवंत विद्यार्थी राजकारणात आला नाही. शिवाय आजच्या राजकारणात यावे, असे मनापासून वाटेल असे राजकारण तरी आहे का? 

शेवटचा मुद्दा... याच छात्र परिषदेत ‘आम आदमी’ पक्षाच्या दिल्लीच्या राघव चड्डा खासदाराने काही घराण्यांची नावे घेतली... त्यात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी अशी नावे घेवून घराणेशाही सांगितली...  तो तरुण खासदार आहे... त्याने टीका करायला हरकत नाही... पण, त्याला हे माहिती नसावे की, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोतीलाल नेहरू, त्यांच्या पत्नी स्वरूपाराणी, पंडित नेहरू, टी. बी. झालेली त्यांची पत्नी कमला, कन्या इंदिरा, बहिण विजयालक्ष्मी, दुसरी बहिण कृष्णा, या  दोघींचे पती रणजीत पंडित... आणि राजा हाथीसिंग... अशा नेहरू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने स्वातंत्र्याच्या चळवळीत ब्रिटीशांच्या तुरुंगात सक्त मजुरीचा तुरुंगवास भोगलेला आहे. याच ‘घराणेशाही’तील दोघांचे (इंदिराजी-राजीव गांधी) देशासाठी बलिदान झालेले आहे. टीका करायला हरकत नाही... पण, घराणेशाहीतील एका घराण्याने केलेला त्याग आणि बलिदान हेही सांगण्याची दानत ठेवा.... जगातील एकाही देशात स्वातंत्र्यासाठी संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब तुरुंगात गेल्याचे एक तरी उदाहरण दाखवा आणि मग बोला... आणि एका कुटुंबातील पंतप्रधान पदावर असलेल्या दोघांचे देशाच्या ऐक्यासाठी बलिदान झाले, असेही एखादे उदाहरण असेल तर दाखवून द्या. तेवढा माझा अभ्यास अजून झालेला नाही. म्हणून मदत करा. सध्या एवढेच.... 

- मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.