Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अशीही रमा-माधव मैत्री...

अशीही  रमा-माधव मैत्री...


मराठी पत्रकारितेतील ‘शेवटचा मालुसरा’म्हणता येईल, असे ‘चौफेर’ संपादक श्री. माधव गडकरी यांची ९४ वी जयंती २५ सप्टेंबर रोजी आहे.  पणजीमध्ये गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री रमाकांत खलप यांनी त्या दिवशी एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माधव गडकरी २००६ साली गेले. त्यांच्या जाण्याला आता १६ वर्षे झाली. रमाकांत खलप हे एका अर्थाने राजकारणी आहेत. राजकरणातील माणसे पत्रकारांना त्यांच्या जरूरीपुरते लक्षात ठेवतात. किंवा तो पत्रकार संपादक असेपर्यंतच त्याचे महत्त्व असते. अलिकडे तर हे असेच होणार... कारण लक्षात ठेवावेत, असे संपादक नाहीत. मग ते निवृत्त असोत, किंवा नसोत. अलिकडे ‘संपादक काय म्हणतो’ याकरिता कोणतेच वृत्तपत्र वाचले जात नाही. संपादकांची गरजसुद्धा नाही. महाराष्ट्राची विधानसभा तब्बल दीड-दोन वर्षे अध्यक्षाशिवाय चालू शकली. अलिकडचे वृत्तपत्रही संपादकांशिवाय चालू शकते. किंवा संपादक असले तरी एका संपादकाने लिहून भागते. बाकीच्या सगळ्या वृत्तपत्रांना तोच मजकूर पाठवला जातो. सगळेच बदलले आहे. त्यामुळे वृत्तपत्रांना आज कोणी गांभीर्याने घेत नाही. आणि वृत्तपत्रे जाहिरातींवरच चालत असल्याने संपादकांचे महत्त्व कमी झालेले आहे. अशा या काळात गोव्याच्या रमाकांत खलप यांनी माधव गडकरी यांची आठवण ठेवून त्यांची जयंती साजरी करावी, हे अप्रूपच. माधवरावांचे मोठेपण या निमित्ताने जसे चर्चेत येईल, त्याही पेक्षा मला रमाकांत खलप यांच्या मोठेपणाची कमाल वाटते. त्याकरिता जे मनाचे मोठेपण लागते ते त्यांच्या या प्रांजळ कार्यक्रमातून दिसते. खलप काँग्रेसचे आहेत. राजकारणात आहेतही आणि नाहीतही. गोव्यातील या लोकप्रिय नेत्याला काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत तिकीटही दिले नाही. कालच्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील काँग्रेसचे काय  धिंधवडे झाले, ज्यांना काँग्रेसने तिकीटे दिली, जे निवडून आले ते कसे 'दिगंबर' झाले, हे सगळ्यांनी पाहिले. अशा या राजकारणाीतल भयंकर दिवसांत खलपसाहेब एका झुंझार पत्रकाराची जयंती साजरी करतात. पहिला सलाम खलपसाहेब यांना केला पाहिजे. नंतर माधवरावांना. ही खरी ‘रमा-माधव’ मैत्री. 

गडकरी यांना मी ‘शेवटचा मालुसरा’ म्हटले.  त्यावेळी आप्पासाहेब खाडीलकर (नवाकाळ), द्वा. भ. कर्णिक (महाराष्ट्र टाईम्स), ह. रा. महाजनी (लोकसत्ता), प्रभाकर पाध्ये, नंतर पु. रा. बेहरे (नवशक्ती) असे त्यापूर्वीचे संपादक मोठेच होते. पण, आचार्य अत्रे सोडले तरी त्यांच्यानंतर खऱ्या अर्थाने ज्याला लढवय्या संपादक म्हणता येईल, असे माधव गडकरी होते. संपादकांच्या चेंबरमध्ये बसून अग्रलेख लिहण्यापुरते अनेक संपादक झाले. पण, मराठी पत्रकारितेत बाळशास्त्री जांभेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर आचार्य अत्रे असे चौफेर पत्रकार जे होते त्यानंतर माधव गडकरी यांच्या नावाशी येवूनच थांबावे लागेल. असा हा ‘लोकांमधील संपादक’ होता. शिवाय सतत लिहणारे फार थोडे संपादक असतात. जे आयुष्यभर लिहित राहिले, त्यात पहिले आचार्य अत्रे नंतर माधव गडकरी. त्यांचा अग्रलेख असो किंवा त्यांचे गाजलेले ‘चौफेर’ सदर असो.... संपादकाच्या लेखाची वाट पाहणारे वाचक ज्या संपादकांच्या वाट्याला आले त्यात आचार्य अत्रे यांच्यानंतर माधवरावच. 

असा हा विलक्षण संपादक.... त्यांच्या आणि माझ्यात एकच समान धागा.... त्यांनी ३० पुस्तके लिहिली.... त्यातील पहिले पुस्तक अचार्य अत्रे यांच्यावर... माझीही जवळापास ३० पुस्तके झाली. पहिले पुस्तक आचार्य अत्रे यांच्यावरच. ही तुलना नव्हे. माधवराव फार मोठा माणूस होता.  स्वत:च्या ताकदीवर मुंबईत दैनिक ‘मुंबई सकाळ’ला त्यांनी बाजारात उभे केले. पुण्यातील सकाळ.... ‘दैनिक सकाळ’नेच सुरू होते. मुंबईत ‘सकाळ’ सुरू करताना  माधवरावांच्या हातात ‘मुंबई सकाळ’ होता म्हणून शक्य झाले. पूर्वी ‘सकाळ’ची पद्धत अशी होती की, संपादकीय पान सर्वच आवृत्त्यांना सारखे... आजही अनेक वृत्तपत्रांत ती पद्धत आहे... ती सोयीची पण आहे... अडचणीची पण आहे... स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संपादकीय पानाचे प्रत्येक भागाचे महत्त्व वेगळे असते. बातमीनेच वाचा फुटते असे नव्हे. ‘संपादकीय’नेही घणाघात करता येतो. माधवरावांनी ही पद्धती बदलून टाकली. त्यांच्या व्यवस्थापनाशी त्यांचा थोडा वाद झाला. ते योग्य आहे ते ठामपणे करत होते. कोणती बातमी देवू आणि कोणती दडपू, अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती. मुंबई पोलिसांमधील काही अपप्रवृत्तींवर त्यांनी तडाकून लिहिले. त्यावेळच्या मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांना नोटीस पाठवली. प्रेस कौन्सिलकडे तक्रार केली. माधवराव वदले नाहीत. प्रेस कौनि्सलसमोर ते उभे राहिले. असा एक विषय नाही... प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरावर सोन्याचा कळस चढवला... माधवराव सहज लिहून गेले.... ‘गणपतीचा मुकूट सोन्याचा समजू शकतो.... मंदिराचा कळस सोन्याचा कशाला?’ या विषयाने बराच वाद झाला. त्यांच्या पार्ले येथील राहत्या घराच्या गॅलरीत बॉम्बस्फोटही घडवला. पण माधवराव घाबरले नाहीत.  त्यांच्यात काही गुणविशेष होते... संपादक आपले महत्त्व कायम ठेवत असतो. माधवरावांनी संपादकीय विभागातील अनेकांना त्यांच्या वृत्तपत्रात मोठी जागा देवून लिहीते केले. राधाकृष्ण नार्वेकर, विजयकुमार बांदल हे त्यांनी  घडवलेले संपादक. सहकाऱ्यांमध्ये नेमका कोणता गूण आहे, हे हेरण्याची त्यांची विशेषता होती. 

संपादकाने त्याच्या चेंबरमध्ये न बसता लोकांमध्ये सतत मिसळले पाहिजे.... असा मिसळणारा संपादक म्हणूनही माधवराव खूप मोठे. साहित्य, कला, संस्कृती, राजकारण या सर्व क्षेत्रांत त्यांचे मोठे मित्र. शिवाय त्यांना एक मोठी हौस होती की, जे आपल्याला कळले ते मोठ्या आनंदाने आपल्या वृत्तपत्रातून जगाला सांगायचे. मॉरिशसचे पंतप्रधान राम गुलाम असोत... किंवा मंत्री शीलाबापू....  हजारो मैलावरच्या मराठी परंपरा असलेल्या मॉरिशच्या या नेत्यांना माधवरावांनीच मराठी वाचकांच्या घराघरात पोहोचवले. 

सर्वांशीच चांगले संबंध ठेवण्यात ते फार निष्णात होते. त्यांच्याबद्दल आति्मयताही वाटायची आणि त्यांच्या पत्रकारितेचा दराराही वाटायचा.. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्यासोबत चीनला भेट देणारे ते एकमेव मराठी पत्रकार. टोकीयो येथे झालेल्या सातव्या जागतिक माध्यम परिषदेचे ज्यांना आमंत्रण आले, असेही एकमेव मराठी पत्रकार. 

आता तसं पाहिलं तर गोव्याचा आणि माधवरावांचा संबंध आला ते ‘गोमांतक’ या गोव्यातील त्यावेळच्या मुख्य वृत्तपत्राचे संपादक झाले तेव्हा. रमाकांत खलप यांच्यामधील नेतृत्त्व गुण हेरून रमाकांत यांना आधी गोव्यात ‘गोमंतक’मध्ये मोठी प्रसिद्धी देणारे माधवरावच. त्यानंतर ‘मुंबई सकाळ’, ‘लोकसत्ता’ या दैनिकांचे संपादक झाल्यानंतरही मराठी माणसांना रमाकांत खलप घराघरात माहिती झाले. ते माधवराव यांच्यामुळेच. मैत्री टिकवणारा हा माणूस होता. त्यामुळेच साहित्यिकांमध्ये त्यांची उठ-बस होती आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जागेवर जाऊन मािहती घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. 

स्वत:ची नियतकािलके सुरू करून १९४५ साली  ते पत्रकारितेत आले. १९५५ ते १९६२ अशी सात वर्षे दिल्ली आकाशवाणीत  नोकरीही केली. १९६२ ते १९६७ ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये उपसंपादकही राहिले. वृत्तपत्रांतील त्यांचा प्रवासही असा चौफेरच होता. कदाचित त्यांच्या सदराला त्यामुळेच त्यांनी ‘चौफेर’ हे नाव दिले असेल. सदरामध्ये लिहिलेले लेख तात्कालिन असतात.  पण माधवरावांनी ‘चौफेर’ आणि ‘दृष्टीक्षेप’ या त्यांच्या सदरात लिहलेल्या लेखांची १० पुस्तके काढली. 

अशा या माधवरांची  संपादकीय कामगिरी तब्बल ३० वर्षांची आहे.   मात्र त्यांच्या सगळ्या वृत्तपत्रीय कामात त्यांनी महाराष्ट्राचे १९८० सालचे मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांना झोडपण्यासाठी त्यांची लेखणी वापरली. त्या सर्व आक्रमक हल्ल्यात त्यांच्यातील पत्रकारापेक्षा अंतुले विरोधातला राजकारणी जास्त वाटला. १९८२ साली त्यांनी अंतुले य्ाांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून पुस्तकही लिहिले. त्याकाळात मात्र माधवरावांची लेखणी दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे, असे जाणवत होते. त्यावेळचा सगळा तपशील मला पूर्ण मािहती आहे.  ही अंतुले विरोधी मोहिम का सुरू झाली?, त्याची सुरुवात कोठून झाली? या सगळ्याची चर्चा केली तर आणखी एक पुस्तक होईल. अंतुले  यांना राजकारणात पूर्ण बदनाम करेपर्यंत ही मोहीम चालू होती. या सर्व काळात अंतुले यांच्या परिवाराने जे काही भोगले त्यावरही एक पुस्तक होईल. मुलांनी जे भोगले... ते तर ‘मेरा बाप चोर है....’ या दीवार चित्रपटामधील त्या वाक्यासारखेच आहे.  २० वर्षे हा विषय चघळला गेला. अंतुले तर फक्त दीड वर्षे मुख्यमंत्री होते. पण त्यांची कायदेशीर लढाई १८ वर्षे चालली. त्या लढाईत मोलाची २० वर्षे, प्रचंड पैसा, वेळ, मनस्ताप सर्व काही त्यांनी शांतपणे सहन केले. शेवटी ते न्यायालयाकडून निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. पण त्याला फार उशीर झाला होता. मोठे पत्रकारसुद्धा आपल्या हातात लेखणी आहे म्हणून काही वेळा ‘कोणाच्यातरी सांगण्यावरून’ लिहीत असतात. त्या काळात ते मोठ्या चवीने वाचले जाते. माधवरावांच्या त्या सर्व लिखाणाच्यावेळी त्यांनी केलेले कोणतेही आरोप कोर्टात टिकले नाहीत. तिथपर्यंत माधवरावांची पत्रकारिता  ‘लोक पत्रकारिता’ होती. अंतुले यांच्या विरोधातील मोहीमेनंतर त्याला काहीसा उणेपणा आला आिण राजकीय वासही आला. 

असे असले तरी माधवरावांच्या उमद्या पत्रकारितेबद्दल सर्वांना आदरच आहे. माधवरावांनी १९७६ ला गोवा सोडले. त्यालाही आता ४६ वर्षे झाली. रमाकांत खलपही आता ७५ वर्षांचे होवून गेले.  पण महाराष्ट्रातील या पत्रकाराची आठवण त्यांनी पणजीत कार्यक्रम ठेवून साजरी करावी, यात खलपसाहेबांचे मोठेपणही ठळकपणे जाणवणारे आहे. हल्ली गरज संपली की, ४६ वर्षे काय, ४६ दिवसही कोणी मैत्री जपत नाही. इथे माधवरावांपेक्षा खलप मनाने मोठे वाटतात. 

या कार्यक्रमाला त्यांनी मलाही आमंत्रित केले आहे. माझा आणि माधवरावांचा समान धागा म्हणजे आम्हा दोघांचेही पहिले पुस्तक अत्रेसाहेबांवर आहे. तसाच पणजी आणि माझाही एक ऋणानुबंध आहे... त्याचे असे झाले की, गोवा विधानसभेने १९६५ साली ‘गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा’ असा ठराव गोवा विधानसभेत मंजूर केला. त्यावेळचे मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी आचार्य अत्रे यांना फोन करून ही बातमी सांगितली... बांदोडकरांच्या अिभनंदनाची सभा घ्यायचे ठरले. आझाद मैदानावर सभा ठरली.... आचार्य अत्रे यांच्या हस्ते भाऊसाहेबांचा सत्कार ठरला.  २४ जानेवारी १९६५ ही ती तारीख. अत्रेसाहेब मला त्यांच्यासोबत डकोटा विमानाने गोव्याला घेवून गेले. माझा अत्रेसाहेबांजवळ बसून विमानाचा तो पहिला प्रवास. सभा प्रचंड झाली.  अत्रेसाहेब खूष झाले. त्या सभेला हजारो लोकांच्या झुंडी येत होत्या. त्या झुंडीत घोषणा होती... ‘मांडवी तीरी प्रचंड गर्जना... जिथे मुंबई तिथे गोवा...’  त्या संपूर्ण सभेचे रिपोर्टींग करताना मी १४ कॉलम एवढ्या मजकुराच्या त्या सभेला मुख्य हेडींग तेच दिले... सायंकाळी अत्रेसाहेब ‘मराठा’च्या संपादकीय विभागात आले... त्यांनी ते सर्व रिपोर्टीग वाचले. त्यांनी माझी पाठ थोपाटली... आणि मुख्य शिर्षक बघितले...आणि मला म्हणाले, ‘हे कसले भिकार शिर्षक दिले आहेस..’ मी म्हटले, ‘मग, कोणते देवू?’ अत्रेसाहेबांनी ताड्कन सांगून टाकले... 

‘पणजीत आचार्य अत्रे यांची पंडित नेहरूंपेक्षाही विराट सभा... ’

या मुख्य शिर्षकासकट पणजीतील आझाद मैदानावरील ती सभा ‘मराठा’चे त्या दिवसाचे संपूर्ण पान व्यापून गेली. त्या कार्यक्रमानंतर एक गंमत झाली... भाऊसाहेब बांदोडकरांनी अत्रेसाहेबांना कुत्र्याचे एक छान पिल्लू भेट दिले. त्यावेळी गोवा महाराष्ट्रात विलिन करायला विरोध करणारे जॅक सिक्वेरा नावाचे एक नेते होते. पुढे ते कुत्र्याचे पिल्लू मोठे झाले आणि अत्रेसाहेबांनी त्या कुत्र्याचे नाव ‘जॅक’ ठेवले. 

पण आणखी भयंकर गोष्ट पुढेच होती... भाऊसाहेब बांदोडकरांनी गोवा विधानसभेत महाराष्ट्रात विलिन होण्याचा ठराव जरी केला असला, तरी त्यांच्या मनात ‘गोव्याचे स्थान स्वतंत्रच’ रहावे, असे होते. अत्रेसाहेबांना ही गोष्ट नंतर कळली. ‘महाराष्ट्रात विलिन व्हायचे की नाही’ या मुद्यावर १६ जानेवारी १९६७  रोजी ‘जनमत’ चाचणी घेतली गेली. तो जनमत चाचणी निर्णय महाराष्ट्रात सामील होण्याच्या विरुद्ध गेला. त्याचे मुख्य करण भाऊसाहेबांचा महाराष्ट्रात सामील व्हायला आतून विरोध होता. तसेच गोव्यातील सर्व शिक्षकांना महाराष्ट्रातील शिक्षकांच्या दुप्पट पगार होते. या सर्व शिक्षकांनी महाराष्ट्रात सामील होण्याच्या विरोधात प्रचार करून असे वातावरण तयार केले की, ‘महाराष्ट्रात सामील झाले तर, आपले पगार अर्धे होणार’ याचाही मोठा परिणाम झाला. या सर्व काळात रमाकांत खलप हे महाराष्ट्रात गोवा सामील होण्यासाठी अतिशय जिद्दीने प्रचारात उतरलेले होते. गोव्याची राज्य भाषा मराठी व्हावी, हा आग्रहही रमाकांत खलप यांचाच होता. १९८७ साली गोव्याची अधिकृत राज्य भाषा कोकणी असल्याचा ठराव मंजूर झाला. कोकणी भाषेला लिपी नाही म्हणून शासकीय कामाकरिता मराठीचा वापर करायला त्याच ठरावात मान्यता देण्यात आली. पण राज्यभाषा कोकणीच आहे. 

गोवा महाराष्ट्रात  सामील होण्याच्या विरोधात भाऊसाहेब बांदोडकर आहेत, हे समजल्यावर अत्रेसाहेबांनी आपल्या तडाखेबाज लेखणीने भाऊसाहेबांच्या विरोधात तेवढ्याच कडकपणे लिहीले. त्यावेळी माधव गडकरी मुंबईला ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये उपसंपादक होते. गोव्याचे जनमत स्वतंत्र राहण्याच्या बाजूने झाल्यानंतर माधव गडकरी ‘गाेमांतक’मध्ये संपादक म्हणून गेले. त्यावेळचा ‘गोमांतक’ गोवा महाराष्ट्रात सामील व्हावा, याबाजूने प्रखरपणे लिहित होता. पण ‘राष्ट्रमत’ दैनिक मात्र महाराष्ट्रात सामील होण्याच्या विरोधात होते. गोव्याचा कौल महाराष्ट्रात सामील होण्याच्या विरोधात आला. आणि अत्रेसाहेब आणि भाऊसाहेब यांचे संबंध दुरावले. पुढे भाऊसाहेबांनीच भेट दिलेल्या कुत्र्यावर पाय पडून आचार्य अत्रे दादर येथील त्यांच्या निवाससस्थानी पडले. आणि त्यांच्या कमरेचे हाड मोडले. डॉ. बावडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वत: बावडेकरांनी शस्त्रक्रीया करून स्टीलचा रॉड टाकला. त्यानंतर १९६७ ची मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील निवडणूक आचार्य अत्रे यांनी हातात काठी घेवून प्रचार करत लढवली. ते अपक्ष होते. त्यांच्या उमेदवारीला १९६६ साली स्थापना झालेल्या शिवसेनेने आणि प्रामुख्याने बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर विरोध केला होता. आणि त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसचे उमेदवार प्रा. आर. डी. भंडारे यांच्याबाजूने प्रचार केला. अवघ्या ६ हजार मतांनी अत्रेसाहेब पराभूत झाले. त्यातही गंमत अशी की, दलित समाजाचे जास्त मतदार असलेल्या नायगाव मतदारसंघात आचार्य अत्रे यांनी भंडारे यांच्यापेक्षा दहा हजार मतांची आघाडी घेतली. पण दादर मतदारसंघात- जिथं अचार्य अत्रे राहत होते- भंडारे यांना शिवसनेमुळे मोठी आघाडी मिळाली. आणि अत्रेसाहेब फक्त ६ हजार मतांनी पराभूत झाले. राजकारण कसे असते पहा.... १३ अॅागस्ट १९६० ला ‘मार्मिक’ साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले होते. १३ अॅागस्ट हा आचार्य अत्रे यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यादिवशी तसे जाहीर करून मुद्दाम प्रकाशन केले गेले. पण, अवघ्या पाच वर्षात बाळासाहेब ठाकरे यांनी अत्रेसाहेबांना लोकसभा निवडणुकीत विरोध करण्याची भूमिका घेतली. राजकारण असे एका टोकावरून दुसऱ्या टोकाला वाहत जात असते. आताही ते वाहतेच आहे. पण आता त्याचे गटार झाले आहे.  

त्या निवडणुकीच्या निकालानंतरही गंमत झाली.  एका कार्यकर्त्यांने बातमी आणली की, ‘अत्रेसाहेब विजयी झाले आहेत’.... विजयाची बातमी येताच सौ. सुधाताई अत्रे यांनी अत्रेसाहेबांचे औक्षण करण्याकरिता तबकात निरंजन लावले आणि त्या अत्रेसाहेबांना ओवाळणार, एवढ्यात कॉ. सा. गो. पाटकर आले आणि म्हणाले की, ‘हे काय चालले आहे... आपण ६ हजार मतांनी हरलो आहोत.’ ओवाळणीचे ताट हातात तसेच ठेवून सुधाताई म्हणाल्या, ‘नक्की काय....’ अत्रेसाहेब म्हणाले... ‘अगं तू ओवाळ... आपण हरलो काय जिंकलो काय... तिकडे दक्षिण मुंबईत सदोबा पाटील ३० हजार मतांनी पडलेला आहे. जॉर्ज फर्नांडीस विजयी झाला आहे. आपणच सदोबाला पाडलेले आहे... त्याकरिता मी जिवाचे रान केले आहे. आपणच जिंकलो आहोत...’ आणि मग मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आचार्य अत्रे यांना दक्षिण मुंबईत जॉर्ज फर्नांडीस विजयी होवून सदोबा पाटील पडले म्हणून सुधाताईंनी ओवाळले. दुसऱ्या दिवशीच्या ‘मराठा’त  तो नितांत सुंदर अग्रलेख लाखो वाचकांच्या मनावर अजूनही कोरला गेला आहे...  त्याचे शिर्षक होते.... 

‘आम्ही जिंकलो.... आम्ही हरलो....’


- मधुकर भावे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.