कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन, वर्कआउट करताना आलेला हार्टअटॅक
नवी दिल्ली: प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज २१ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. ज्येष्ठ कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ४० दिवसांपासून ते इस्पितळात दाखल होते. जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आलेला. त्यांच्या नियमित दिनचर्येनुसार, ते नेहमीप्रमाणे सकाळी जिममध्ये व्यायाम करत होते. ट्रेडमिलवर चालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले.
त्यांची प्रकृती पाहता त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज इस्पितळातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. काल राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते.
१९८८ मध्ये अभिनयाला केली सुरुवात, २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश
राजू श्रीवास्तव केवळ विनोदी कलाकारच नाही तर अभिनेते आणि राजकारणीदेखील होते. १९८८ मध्ये छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे राजू श्रीवास्तव सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' सिनेमात दिसले होते. नंतर त्यांनी आणखी काही सिनेमे केले आणि नंतर कॉमेडीमध्ये प्रवेश केला. राजू श्रीवास्तव यांना द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, कॉमेडी का महामुकाबला यांसारख्या शोमधून ओळख मिळाली. ते 'बिग बॉस ३' आणि 'नच बलिए' सारख्या शोमध्येही दिसले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.