Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान



सांगली, दि. 23  : आगामी सण, उत्सव व विविध आंदोलने या बाबींवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरीता पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.

रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व त्यांची वर्तणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे. अशा मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढू नयेत असे मार्ग, अशा वेळा विहीत करणे. सर्व मिरवणुकींच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेच्या आसपास, उपासनेच्यावेळी कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये, घाटात, किंवा घाटावर किंवा सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये जत्रा, देवळे, आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ किंवा सार्वजनिक जागेत, किंवा सार्वजनिक जागेजवळ वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक उपहाराच्या जागेत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 33, 35, 37 ते 40, 43, 45 अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अधिन असलेल्या व त्यांस पुष्ठी देणारे योग्य ते आदेश काढणे, असे अधिकार प्रदान केले आहेत.

सदरचा आदेश दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. या दरम्यान पोलीस ठाणे स्थलसिमा हद्दीत कोणालाही मोर्चे, मिरवणुका, निदर्शने, सभा इत्यादी आयोजित करावयाचे असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस ठाणे अधिकारी किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून वेळ, मार्ग, घोषणा, सभेचे ठिकाण, जनसमुदाय इत्यादी बाबी ठरवून घेवून परवानगी घेतली पाहिजे. सदर आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाईस पात्र राहील, असे आदेश पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी  दिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.