लग्न करताय? मग या देशात भारतीयांना आहे खास निमंत्रण
भारतीय विवाह किंवा इंडियन वेडिंगचे वर्णन ‘ बिग फॅट वेडिंग” असे केले जाते. भारतीय विवाहात बरात, बेंडबाजा, वऱ्हाडी, मेजवान्या यावर दणकून खर्च केला जातो. आता अनेक लग्नाळू, डेस्टीनेशन वेडिंगला प्राधान्य देताना दिसतात. म्हणजे दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणी किंवा परदेशात जाऊन लग्न करणे. असा विवाह करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना खास संधी एक देश देऊ पाहतो आहे.
पांढऱ्या शुभ्र वाळूचे सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाईफ, ऐतिहासिक स्थळे आणि सुंदर बुद्ध मंदिरे, अप्रतिम निसर्गसौदर्याने नटलेला थायलंड किंवा पूर्वीचा सयाम पर्यटकांचे आवडते ठिकाण आहेच. आत्ता ते वेडिंग डेस्टिनेशन म्हणून सुद्धा पुढे येऊ लागले आहे. अनेक भारतीय हनिमून म्हटले कि प्रथम थायलंडचा विचार करतात पण आता ते विवाह आणि हनिमून अश्या दोन्हीसाठी थायलंडचा विचार करू शकतील.
थायलंडची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देतानाच हा देश भारतीयांना विवाह करण्यासाठी येथे या असे आमंत्रण देत आहे. करोना काळात पर्यटनावर विपरीत परिणाम झाला होता पण आता करोना निर्बंध हटल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटन महसुलात वाढ करण्यासाठी देश विविध योजना आखत आहे. थायलंडच्या एकूण जीडीपी मध्ये पर्यटनातून येणारा महसूल १२ टक्के आहे. आता हा महसूल वाढविण्यासाठी भारतीय विवाह आणि हनिमून यांना टार्गेट केले जात आहे. २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीत हा महसूल ६०० ते ७०० अब्जावर जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डेस्टिनेशन वेडिंग मध्ये भारतीयांचे योगदान ६० टक्के आहेच पण विदेशात स्थायिक झालेले भारतीय सुद्धा येथे येतात.
परिणामी मुंबई, दिल्ली येथील वेडिंग प्लॅनर्स थायलंड मध्ये वेडिंग पॅकेज करार मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. २०२२ मध्ये थायलंड समृद्र किनाऱ्यावर किमान ४०० विवाह आणि ५ लाख भारतीय पर्यटक यावेत यासाठी खास योजना जाहीर करत आहे असे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.