Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवाराचं 'सिक्रेट'

सुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवाराचं 'सिक्रेट'


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आपल्या पक्षाबाबत नेहमीच आत्मविश्वास दाखवतात. तसेच, शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचंही त्यांच्याकडून सातत्याने कौतुक होत असतं. त्यामुळेच, साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेनंतर राज्यात बदललेलं राजकारण हा चर्चेचा देशपातळीवरील लक्षवेधी विषय ठरला होता. शरद पवार यांच्या खेळीनेच महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. मात्र, फडणवीसांच्या खेळीने शिवसेनेत उभी फूट होऊन एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे, सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात बसला आहे. आता, सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा सत्तेत येण्याचं विधान केलं आहे.

सुप्रिया सुळेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शरद पवारांचा दाखला देत सत्तेत येण्याचं विधान केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे जाहीर सभेत नुकतंच सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांवरील लोकांच्या प्रेमाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेलं नाही. कारण शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलंच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

शरद पवार विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. कारण, २०१९ च्या निवडणुकांवेळी अशीच प्रचिती आली होती. शरद पवारांचा दौरा झाला अन् राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश मिळालं होतं. त्यानंतर, ते सत्तेतही आले.

बाळासाहेबांना किती वेदना होत असतील

शिवसेना आणि शिंदे गटात सध्या सुरू असलेली न्यायालयीन लढाई खूप दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील. तुमच्यात मतभेद असतील तर वेगळे घर करायला हवे. तुम्हाला शुभेच्छा असतील. पण, ओरबाडून घेतले जात असून ठाकरे कुटुंबावर नको ते आरोप केले जात आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरत आहेत. मात्र, त्यांना बाळासाहेबांची मुले आणि नातवंडे चालत नाहीत. हे खूप दुर्दैवी असून आपल्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे, अशी खंत व्यक्त करत शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.