पोस्टाच्या 'या' योजनेत दररोज भरा 95 रुपये; मुदतीनंतर मिळतील 14 लाखांसह अनेक फायदे
मुंबई : पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवतं. त्यापैकीच एक योजना म्हणजे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना. या योजनेत दररोज 95 रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीनंतर जवळपास 14 लाख रुपये मिळू शकतात.
ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना या नावावरूनच हे स्पष्ट होतं, की ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आहे. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही एक मनी बॅक पॉलिसी आहे. देशाच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना विमा योजनेचा लाभ मिळवून देणं हा या योजनेचा उद्देश आहे. तसंच, समाजातला आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आणि महिलांना विमा योजनेचा लाभ देणं हाही या योजनेचा उद्देश आहे.
अशा योजनांमुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांमध्ये विम्याबद्दल असलेली जागरूकता वाढीला लागेल, असं सरकारला वाटतं. पोस्ट ऑफिसची ही योजना 1995 साली सुरू करण्यात आली. ही एक मनी बॅक पॉलिसी असल्यामुळे विमा घेणाऱ्या व्यक्तीला योजनेच्या कालावधीत मध्ये मध्ये काही रक्कम परत दिली जाते. ही एक एंडॉवमेंट स्कीम आहे.
योजनेच्या काळात विमा घेणाऱ्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास मॅच्युरिटीच्या रकमेमध्ये मनी बॅकची रक्कम जमा केली जात नाही. विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला बोनससह 'सम अॅश्युअर्ड'ची पूर्ण रक्कम दिली जाते. ही पॉलिसी 15 वर्षं आणि 20 वर्षं अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. पॉलिसी घेण्यासाठी संबंधित ग्राहकाचं वय कमीत कमी 19 वर्षं असावं, अशी अट आहे.
फायदे या योजनेत मनीबॅक सुविधा उपलब्ध आहे. पॉलिसीची मुदत पूर्ण होईपर्यंत संबंधित ग्राहक हयात असेल, तर त्याला मनी बॅक योजनेचा फायदा होतो. तीन वेळा हा लाभ मिळतो. या अंतर्गत 15 वर्षांच्या पॉलिसीमध्ये सहा वर्षं, नऊ वर्षं आणि 12 वर्षं पूर्ण झाल्यावर 20-20 टक्के रक्कम परत मिळते.
याच तऱ्हेने 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 8, 12 आणि 16 वर्षांनी 20-20 टक्के रक्कम परत मिळते. मुदतपूर्तीनंतर बोनससह उर्वरित 40 टक्के रक्कमदेखील दिली जाते. एखादी व्यक्ती 25 वर्षांची असेल आणि सात लाख रुपयांच्या विमा पॉलिसीमध्ये 20 वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा 2853 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच दररोज सुमारे 95 रुपयांची बचत करावी लागेल. सहा महिन्यांसाठी 17 हजार 100 रुपये, तर तीन महिन्यांसाठी 8850 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. मॅच्युरिटीनंतर 14 लाख रुपये मिळतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.