इराणमधील आंदोलन पसरले 80 शहरांत; आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू
तेहरान : इराणमध्ये हिजाबविरोधात भडकलेल्या आंदोलनाची धग आतापर्यंत देशातील 80 शहरांमध्ये पसरली आहे. माहसा आमिन या 22 वर्षीय युवतीचा पोलिसांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर देशभरातील महिला रस्त्यावर उतरून हिजाबच्या सक्तीचा निषेध करू लागल्या आहेत. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातोल्ला अली खामेनी आणि इराणमधील इस्लामी राजवटीच्या कडक नियमांविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि मोर्चे काढले जात आहेत.
आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या संघर्षात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 5 सुरक्षा रक्षकही ठार झाले आहेत. मशहाद, कचान, शिराझ, तबरीज आणि कराज या शहरामध्ये जोरदार संघर्ष झाला असल्याचे इराणमधील सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसात आंदोलक महिलांनी आपले हिजाब रस्त्यावर टाकून पेटवून दिले आहेत. तर पुरुषांनी आयातोल्ला अली खामेनी यांचे बॅनर पेटवून दिले आहेत. कौम आणि इशपान या धार्मिक शहरांमध्येही हे आंदोलन भडकले आहे.
एवढेच नव्हे तर इराणच्या रिव्होल्युशन गार्डचे दिवंगत कमांडर कासेम सुलेमानी यांच्या पोस्टरचीही होळी अनेक ठिकाणी करण्यात आली. सुलेमानी यांची 2020 च्या जानेवारीमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. इराणला इराक आणि सीरियातील सत्तेवर पकड येण्याच्या शक्यतेने हा जनप्रक्षोभ व्यक्त होतो आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.