लम्पी चर्मरोगाच्या लसीकरणासाठी 310 खाजगी सेवादात्यांची सेवा अधिग्रहीत
सांगली, दि. 23 : जिल्ह्यातील जनावरांमध्ये पसरत असलेल्या लम्पी चर्मरोग साथीचा प्रादुर्भाव जलद गतीने व प्रभावीपणे रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी 310 खाजगी सेवादात्यांची सेवा अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे, राज्यातील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग हा साथ रोग आढळून आला आहे व जलदगतीने पसरणार अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही सदर आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याकामी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार लसीकरण करण्यासाठी खाजगी सेवादाता यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी विनंती केली आहे.
लम्पी चर्मरोग नियंत्रण व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याने खाजगी सेवादाता यांच्या सेवा अधिग्रहीत करणे आवश्यक आहे.
डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सदर आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्ह्यातील 310 खाजगी सेवादाता यांच्या सेवा विविध पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अधिग्रहीत करण्यात आली आहे.
संबंधित खाजगी सेवादाता यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर यांच्या नियंत्रणाखाली व आदेशान्वये कामकाज करावयाचे आहे. खाजगी सेवादाता यांना मानधन अदा करावयाची कार्यवाही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी नियमानुसार करावयाची आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.