लोकमान्य सहकारी सोसायटीच्या 3000 कोटीच्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आ. अभय पाटील यांची मागणी
बेळगाव: येथील लोकमान्य सहकारी सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी विधिमंडळात केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या संस्थेमध्ये तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. या संस्थेशी संलग्न असलेल्या इतर संस्थांमधील काही कर्मचाऱ्यांच्या नावे सुमारे 40 कोटी रुपयांचे कर्ज कोणतीही हमी घेण्यापूर्वीच देण्यात आले आहे. तसेच या सहकारी संस्थेमध्ये अनेक कर्ज प्रकरणे बोगस स्वरूपात तयार करण्यात आली आहेत. सोसायटीचे सीईओ अभिजीत दीक्षित यांना चाळीस कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यापूर्वी मागील जिल्हाधिकाऱ्यांनी अभिजीत दीक्षित यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही काढला होता.
तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे 120 कोटी रुपयांचे कर्ज कोणतीही हमी घेण्यापूर्वीच देण्यात आले आहे. याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या सर्व आर्थिक गैरव्यवहारामुळे सोसायटीच्या अध्यक्षांसह प्रत्येक संचालकाची आणि खातेधारकाची सखोल चौकशी करावी . त्याचप्रमाणे बेनामी स्वरूपात रकमा ठेवलेल्या गुंतवणूकदारांची चौकशी करावी. कर्जदारांना जामीन राहिलेल्या सदस्यांची देखील चौकशी व्हावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. सुमारे 3000 कोटी रुपयांच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे याच्या ईडी चौकशीची शक्यता वाढलेली आहे. तसेच यापूर्वी झालेल्या सहारा घोटाळ्याप्रमाणे हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. त्यामुळे याची चौकशी झाल्यास काहींना कारागृहाची हवा देखील खावी लागण्याची शक्यता आहे असे मत आ. अभय पाटील यांनी मांडले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.