समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयांना 28 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली, दि. 29, : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाच्या प्र. ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी केले आहे.
समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सन 2022-23 साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सन 2022-23 साठी इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना या समान निधी योजना आहेत. या योजनेव्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठी प्रस्ताव सादर करू नयेत.
सन 2022-23 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान "ज्ञान कोपरा" विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य, महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य, बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय "बाल कोपरा स्थापन" करण्याकरीता अर्थसहाय्य.
ग्रंथालयांनी या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव मुदतीत पाठविणे आवश्यक आहे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.