नळपाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एकत्रितपणे करावेत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 3, : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांनी एकत्रितपणे प्रस्ताव तयार करावेत. या योजनांचे प्रस्ताव तयार करताना अंदाजित खर्च व योजना चालविण्यासाठी येणारा खर्च याबाबत समतोल ठेवून प्रस्ताव तयार करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक विजयंसिंह जाधव, जि. प. उप कार्यकारी अभियंता डी. जी. सोनवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करताना त्याची बारकाईने तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर दीड पटीच्या वर किंमत जात असेल अशा योजनांची तपासणी करावी. जिल्ह्यामध्ये आज नवीन 9 पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे. या 9 योजनांव्दारे 3 हजार 213 नळजोडण्या होतील. या योजनांची पुढील कार्यवाही तातडीने करावी. जिल्ह्यात आत्तापर्यंत 706 पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व योजनांचे डीपीआर तयार झालेले आहेत. यापैकी 586 योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. 485 योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यांचे टेंडरही प्रसिध्द झाले आहे. यापैकी 339 योजनांना कार्यादेश दिले आहेत. यापैकी 307 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत व 42 योजनांची कामे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.