अधिकाऱ्यानं केली सेक्सची मागणी तर कर्मचाऱ्यानं मागितला किस; महावितरण कार्यालयातील प्रकार
जळगाव : महावितरणच्या कार्यालयातील मानवसंसाधन विभागाच्या व्यवस्थापकाने त्यांच्याकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला असलेल्या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली तर लिपिकाने किस मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कार्यालयाच्या विशाखा समितीकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यानुसार व्यवस्थापक उद्धव कडवे व निम्नश्रेणी लिपीक राजेंद्र अमोदकर या दोघांविरुध्द गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ वर्षीय तरुणी ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महावितरणच्या मानव संसाधान विभागात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून कामाला होती. या विभागात व्यवस्थापक तथा विभाग प्रमुख म्हणून उद्धव कडवे हा आहे. टपालाच्या कामासंदर्भात सातत्याने त्याच्या दालनात जावे लागत होते. काम करत असताना कडवे याच्याकडून रात्री उशिरापर्यंत थांबविणे, शिपाई असताना पाणी आणायला लावणे असे कामे मुद्दाम सांगून रात्री उशीर झाला तर घरी सोडून देईल असे सांगत असतानाच कडवे याने शरीरसुखाची मागणी केली. त्यास नकार दिला असता तुला कामावरुन काढून टाकेल धमकी त्याने दिली. त्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून कडवे याने पीडितेला तीन वेळा कामावरुन काढले व परत घेतले. ऑक्टोबर २०२१ मध्ये परत कामावरुन काढून टाकले. त्यानंतर पीडिता कधीच कार्यालयात गेली नाही.
अपूर्ण कामाच्या नावाने पुन्हा बोलावले
११ मे २०२२ रोजी निम्नश्रेणी लिपीक राजेंद्र आमोदकर याने पीडितेलाग फोन कर, असा मेसेज केला. त्यामुळे त्याला फोन केला असता तुझ्या कार्यकाळातील काही नोंदी बाकी आहेत. तुला कडवे साहेबांनी बोलावले आहे. असा निरोप आमोदकर याने दिला. त्यानुसार १२ मे रोजी दुपारी कार्यालयात गेल्यावर आमोदकर व कडवे यांना भेटून काय काम बाकी आहे अशी विचारणा केली. त्यावर नोंदीत काही क्रमांक रिक्त सोडले आहेत, ते पूर्ण करायचे आहे असे दोघांना सांगितले.
अधिकारी म्हटला, मला माफ कर !
कडवे याने पीडितेला दालनात बोलावले व टेक्नीकल साईडचे लोक माझ्याविरुध्द काही कटकारस्थान करीत आहेत, तू त्यांना सपोर्ट करते आहे असे मला समजले आहे, हे खरे आहे का? अशी विचारण केली. त्यावर मी काम सोडले आहे माझा आता कोणाशीच संबंध नाही असे पीडितेने सांगितले. त्यावर कडवे याने मागे जे झाले ते विसरुन जा, मला माफ कर. मी तुला कामावर परत घेतो असे सांगितले. त्यानंतर बाकी राहिलेल्या नोंदीचे काम पूर्ण कर व आमोदकर तुला घरी सोडून देईल असे सांगितले. काम पूर्ण झाल्यावर आमोदकर याने मी तुला घरी सोडतो असे सांगितले. त्यास नकार दिला असता आता तुझे काम झाले आहे, मला गिफ्ट दे असे म्हटला, त्यावर कसले गिफ्ट म्हणून विचारणा केल्यावर त्याने हातात हात घेतला आणि त्यानंतर किस मागितला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने वरिष्ठ तसेच कार्यालयातील विशाखा समितीकडे तक्रार केली, परंत, त्याची दखल घेण्यात आली नाही. म्हणून उशिराने पोलीस ठाणे गाठून तक्रारी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.