थॅलेसेमिया, हीमोफीलिया व सिकलसेल आजाराने त्रस्त रूग्णांकरीता विशेष आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
सांगली, दि. १, : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष, जागतिक थॅलेसेमिया दिन, हीमोफीलिया दिन यांचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील थॅलेसेमिया, हीमोफीलिया व सिकलसेल आजाराने त्रस्त रूग्णांकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सार्वजनिक विभाग सांगली व समवेदना मेडीकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. हा कार्यक्रम आयोजित करण्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, समवेदना मेडीकल फाऊंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर, सदाशिव हेगडे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे, डॉ. सतीश अष्टेकर, डॉ. जालिंदर बारवकर तसेच बालरोग विभागातील अध्यापक उपस्थित होते.
या शिबीरामध्ये थॅलेसेमिया, हीमोफीलिया व सिकलसेल आजाराने ग्रस्त बालके व प्रौढांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. तसेच या रूग्णांना वारंवार रक्तसंक्रमण करावे लागत असल्याने त्यांना कावीळ ब व क चा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्या आजारांची सर्व उपस्थित असलेल्या रूग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच थॅलेसेमिया रूग्णांकरिता वारंवार रक्त दिल्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण अतिरिक्त प्रमाणात वाढ झाल्याने विविध अवयव निकामी होत असतात. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक गोळ्यांचे मोफत वाट करण्यात आले. हिमोफिलिया रूग्णांकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्यंत आवश्यक असणारा फॅक्टर ८ नंबर उपलब्ध झाल्याने रूग्णांना त्रास कमी होणार आहे. दोन्ही आजारातील औषधे उपलब्ध असल्याने ती रूग्णांनी घेवून जावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ. सुरक्षा बेलोकर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व थॅलेसेमिया हिमोफेलिया व सिकलसेल रूग्ण व त्यांच्या पालकांनी शासनाच्या या विधायक कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.