आता घरपोच दारू विक्री बंद; राज्य सरकारकडून निर्णय मागे, राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश
मुंबई : राज्य सरकारकडून घरपोच मद्य विक्री करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने आदेश देण्यात आला आहे. कोरोना कालावधीत घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने घरपोच मद्य विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट होते. राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर बनली होती. कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाऊनचा परिणाम हा जवळपास सर्वच उद्योगधंद्यांवर झाला. मद्य व्यवसायालाही कोरोनाचा मोठा फटका बसला. मद्य व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी जे परवानाधारक मद्य विक्रेते आहेत, त्यांना घरपोहोच दारू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्णय
कोरोना काळात लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाऊन काळात सर्वच उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने देखील बंद होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र दारूच्या दुकानांपुढे गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. दारू खरेदीसाठी मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. गर्दी वाढल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारने जे दारू विक्रेते अधिकृत परवानाधारक आहेत, त्यांना घरपोहोच दारू विक्री करण्याची परवानगी दिली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश
मात्र आता कोरोनाचे संकट टळले आहे. तसेच सर्व निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याने, राज्य सरकारने घरपोच मद्यविक्रीचा निर्णय मागे घेतला आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने आता घरपोच दारू विक्रीचा निर्णय मागे घेतल्याने मद्यपींना घरोपोच दारू मिळणे यापुढे बंद होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.