Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोसीखुर्द प्रकल्पातून मिळाणाऱ्या पाण्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल. - पालकमंत्री जयंत पाटील

गोसीखुर्द प्रकल्पातून मिळाणाऱ्या पाण्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडेल. - पालकमंत्री जयंत पाटील 



- गोसीखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा त्यांच्यासाठी महत्वपुर्ण.

- पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट घेवून दौऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.


सांगली दि. 28 : विदर्भासाठी वरदान असलेला गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी आता नागपूर, चंद्रपूर, भंडारा या भागातील शेतीला मिळेल. गोसीखुर्द प्रकल्पातून मिळाणारे पाण्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात बराच मोठा बदल घडेल. भविष्यकाळात हा भाग सिंचनाखाली येईल. पाण्याची उपलब्ध होईलच पण विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा तसेच पिक पध्दतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणे उपसा सिंचन योजना, पाणी पुरवठा योजना तसेच साखर कारखान्यांच्या पाणी योजना यामुळे सर्व शेती हिरवीगार झाली. बहुतांशी सर्व जमीन ओलिता खाली आली आहे. या सर्व बाबींचा दौऱ्यातील शेतकऱ्यांनी पाहणी करुन त्याप्रमाणे आपल्या भागात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. गोसीखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांचा हा अभ्यास दौरा त्यांच्यासाठी महत्वपुर्ण ठरेल. असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचा पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचा विशेष प्रकल्प तसेच गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील शेतकऱ्यांचा शेतकरी समृध्दी अभ्यास दौरा सध्या सुरु असून या दौऱ्याने इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी साखर कारखाना येथे भेट दिली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेवून या दौऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता अशिष देवगडे, गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे अधिक्षक अभियंत जगत टाले, मुंबई पिपल्स इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सुरेश महिंद, सांगली जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी संजीव माने तसेच नागपूर, भंडारा व चंद्रपुर जिल्ह्यातील दौऱ्यात सहभागी असणारे शेतकरी यावेळी उपस्थित होते. 

ऊसाची शेती किती उत्तमरित्या करता येते याचे उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आहे. ज्यावेळी आपण या भागात दौरा कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की, या भागातील शेतकरी हा स्वबळावर समृध्द झाला आहे. स्वत: कष्ट करुन, स्वत: कर्जे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर शासनाने टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सारख्या उपसा सिंचन योजना राबवून जास्तीत जास्त शेती ओलिताखाली आणली आहे. असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महराष्ट्रात पाण्याची उपलब्ध झाली असली तरी या भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिली आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्याचबरोबर यांत्रिक शेतीलाही प्राधान्य देऊन उत्तम दर्जाची शेती केली आहे. केवळ एक शेतकऱ्याचे हित न जोपासता सामुदायीकपणे सिंचन योजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच शेतकऱ्यांनी परस्परात योग्य संवाद ठेवला. सिंचन योजना योग्य पध्दतीने चालविल्या या योजनांची पाणीपट्टी, देखभाल दुरुस्ती खर्च संस्थांना वेळेत भरुन त्या सक्षम ठेवण्यास मदत केली.  त्यामुळे आज या भागाचे नंदनवण झाले आहे. शेतीतील प्रगतीमुळे येथील राहणीमानही उंचाविले असून शेतकऱ्यांची मुले आता उच्च शिक्षण घेवून वरिष्ठपदांवर काम करित आहेत. तर वेगवेगळ्या उद्योगधंद्ययातही यश मिळविले आहे. 

सांगली जिल्ह्यात ऊस शेतीबरोबरच येथील कष्टकरी शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब अशा फळबागा मोठ्याप्रमाणात उभ्या केल्या, त्याचबरोबर आता अंबा पिकाचेही मोठ्याप्रमाणात लागवड केली जात आहे. तसेच शेतीमध्ये नवनविन प्रयोगही येथील शेतकरी करत असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, विदर्भातून अभ्यास दौऱ्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टींची बारकाईने पाहणी करावी. तसेच तज्ञ शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन ते राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती घ्यावी. शासन विदर्भाच्या विकासासाठी शाश्वत सिंचनावर भर देत आहे. गोसी खुर्द प्रकल्प हा त्याचेच एक उदाहरण असून गोसीखुर्द प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यातून अनुभव, ज्ञान घेवून आपल्याही भागात या पध्दतीचे प्रयोग करावेत. याबाबी करत असताना विदर्भातील शेतकऱ्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहिल. पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नंदनवन विदर्भातही फुलावे यासाठी शेतकऱ्यांनी या दौऱ्यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करुन घ्यावा. जलसंपदा विभागाने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून दौऱ्यावर आलेल्या सर्व शेतकऱ्यांना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी या भागात राबविण्यात येत असणाऱ्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांची बारकाईने पाहणी करावी. तसेच या संस्थांच्या चालणाऱ्या कामाबाबतही माहिती जाणून घ्यावी. पाणी पुरवठा संस्थांनी पाणी पट्टी व दुरुस्ती देखभाल खर्च वेळच्यावेळी भरल्याने या संस्था जोमाने सुरु आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनीही याही बाबींचा बारकाईने अभ्यास करावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

प्रास्ताविकात गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता अशिष देवगडे म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पातून नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा योग्य पध्दतीने वापर व्हावा, शेतकऱ्यांना पीक पध्दतीची माहिती व्हावी, पाणी पुरवठा योजना चालविण्याबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर आणण्यात आले आहे. या दौऱ्यात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची या ठिकाणी पाहणी करावी. तसेच स्वत:साठी उद्भविलेल्या शंकांचे येथील अनुभवी व तज्ज्ञांकडून निराकरण करुन घ्यावे.  पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे. त्याच धर्तीवर विदर्भातही प्रगती व्हावी. यासाठी शेतकऱ्यांचा हा अभ्यास दौरा महत्वपुर्ण आहे. यात जास्तीतजास्त माहिती तंत्रज्ञान तसेच शेतीतील नवनविन प्रयोग, संकल्पना शेतकऱ्यांनी जाणून घ्याव्यात असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. 

यावेळी गासीखुर्द येथून आलेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना प्रतिमा देऊन अभ्यास दौऱ्यात मार्गदर्शन केल्याबद्दल व संवाद साधल्याबद्दल आभार मानले. बेलारी गोसीखुर्द येथील शेतकरी नारायण शिवनकर, वडाळा कालावा गोसीखुर्द येथील शेतकरी अजय ननावरे, उर्मीगाव भंडारा येथील शेतकरी ईश्वर भुते यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी संवाद साधत या दौऱ्यामुळे शेती कशा पध्दतीने करावी याची माहितीही उपलब्ध होत आहे. तसेच या भागातील प्रगती पाहुन आपलाही भाग भविष्यात याच प्रमाणे प्रगती करेल यासाठी हा अभ्यास दौरा आमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे आभार गोसीखुर्द उपसासिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता जगत टाले यांनी आभार मानले. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.