डॉ. बाबासाहेबांच्या बंगल्याची कहाणी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई, दिल्ली, औरंगाबाद तसेच भारतातील अन्य भागात स्वतःच्या पैशाने जमिनी विकत घेतल्या होत्या. या जमिनींवर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे निर्माण व्हावीत त्यातून भारतातील सुसंस्कृत विद्यार्थी घडावेत, विज्ञाननिष्ठ भारताची निर्मिती व्हावी ही बाबासाहेबांची तळमळ होती.
शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होत असतो. शिक्षणामुळेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास होऊन प्रगल्भता येते. शिक्षण हेच माणसाला सर्वाथाने सुसंकृत बनवते. शिक्षणाच्या अभावानेच शूद्र खचले म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वांसाठी शिक्षणाचा आग्रह धरून शाळा सुरू केल्या. संपूर्ण जगभरातला एक हुशार विद्यार्थी महाज्ञानी 'ज्ञानाचं प्रतीक' अर्थात सिम्बॉल ऑफ नॉलेज असणारे बाबासाहेब स्वतःला शेवटपर्यंत ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी मानत.
शिक्षणाचा हा महासागर सर्वांपर्यंत पोहचावा याच उद्देशाने बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.आणि मुंबईत या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 20 जून 1946 साली सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. ज्ञानदानाची हे बोधीवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात स्थापन व्हावेत हाच दूरदृष्टिकोण ठेवून बाबासाहेबांनी 19 डिसेंबर 1947 रोजी पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे स.नंबर 700अ 710/1 702/2 704(3)अ व 704 ब अशी 23 एकर क्षेत्र जमीन क्विंमेंट ऑफिक यांच्याकडून खरेदी केली. तसेच वडगाव मावळ येथील स.नंबर.104/2 ब ही 13 ऐकर जमीन धोंडिबा मोहन येळवडे यांच्याकडून 6 मार्च 1951 रोजी खरेदी केली. तळेगांव दाभाडे येथील जमीन रु.16000/- तर वडगाव मावळ येथील जमीन 4500 रुपयात खरेदी केली.
1947 च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तळेगाव दाभाडे येथील 3500 चौरस फूट जागेत बंगला बांधला. तळेगावची शुद्ध हवा बाबासाहेबांना खूप आवडायची म्हणून ते विश्रांतीसाठी खास याच बंगल्यात येऊन राहात असत. याच तळेगावच्या बंगल्यात बाबासाहेबांनी भारतीय संविधानाचं बरंच काम केलं आहे. तसेच 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचं लिखाणही केले आहे. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या मालमत्तेच्या हक्कांबाबत त्यांच्या वारसांमध्ये वाद निर्माण झाले. ही प्रकरणे न्यायालयात दाखल झाली. तळेगाव दाभाडे येथील जमीन व बंगलासुद्धा न्यायालयीन खटल्यामुळे दुर्लक्षित होता.तळेगाव दाभाडे येथे बाबासाहेबांची जमीन आहे, तेथे बंगला आहे, हे बहुसंख्य अनुयायांना माहीत होते, परंतु दुर्लक्षित.
बंगला ताब्यात नाही म्हणून कोणी सरकार दरबारी पत्रव्यवहार केला नाही. आयुष्यमान किसन थुल, त्यांचे सहकारी आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सनदशीर मार्गाने बंगला ताब्यात घेण्यासाठी लढा दिला आणि तो जिंकला. या संघर्षात त्यांना जो अनुभव आला, ज्यांनी सहकार्य केले त्याचा सविस्तर वृतांत म्हणजे 'लढा बाबासाहेबांच्या बंगल्याचा.' हे पुस्तक. खरं तर किसन थुल अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेल्या पुस्तकामुळे डॉ. बाबाबासाहेब आंबेडकरांची पवित्र वास्तू आणि जमीन मुंबई-पुणेपासून जवळ तळेगाव दाभाडे येथे आहे. याची आंबेडकरी अनुयायांना माहिती झाली.
प्रस्तुत लेखक किसन थूल मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील महाडोळी गावचे चळवळीतील कार्यकर्ते. पत्नी माधुरी थूल यांच्या नोकरी निमित्ताने तळेगावला स्थायिक झाले आणि बाबासाहेबांच्या बंगल्याचा लढा सुरु झाला. तळेगावला रहायला येण्यापूर्वी याही कुटुंबाला तळेगावला बाबासाहेबांची जमीन आणि बंगलाआहे हे माहीतसुद्धा नव्हते. किसन थूल लिहितात, 'माझी पत्नी माधुरी थूल ही मुख्याध्यापिका आहे. नागपूरला 20 वर्षे घालविल्यानंतर 1996 ला माझ्या पत्नीला कार्ला लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बेहरेगाव येथे नोकरी लागल्यामुळे नागपूर सोडले. आम्ही वडगाव मावळ लोणावळा या परिसरात राहात होतो. 2002 साली सध्या राहात असलेला तळेगाव येथील फ्लॅट विकत घेतला. आम्ही राहतो तो आणि आजूबाजूची जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची असून त्यांनी स्वतः बांधलेला बंगला समोरच आहे, असे तिथल्या रहिवाशांनी सांगितले. त्यानंतर बाबासाहेबांचा बंगला मिळवण्याकरिता केलेल्या संघर्षांचा प्रवास पुस्तकात नमूद केला आहे. याच ऐतिहासिक परिसरात कार्ला आणि भाजे या दोन ठिकाणी जगप्रसिद्ध बुद्धकालीन प्राचीन लेणी आहेत. तेथून काही अंतरावर देहू या गावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेण्याच्या दोन वर्षे अगोदर म्हणजेच 25 डिसेंबर 1954 रोजी ब्रम्हदेशातून आणलेली बुद्धांची मूर्ती विहारात स्वतः बसवली आहे, हा परिसर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे.
26 जानेवारी 2004 रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्ष अॅड. रंजनताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मावळ तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आंबेडकरी पक्ष संघटनातील सर्व गटांतील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तळेगाव दाभाडे नगर परिषद व तहसील कार्यालय वडगाव मावळ येथील कागदपत्रे जमा करण्यात आली. समितीने प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा बाबासाहेबांच्या निवासस्थानी म्हणजे बंगल्यात घेतली. त्यांनंतर एकापाठोपाठ अनेक कार्यक्रम घेतले. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात माजी न्यायमूर्ती सी.येस.थुल, आनंदराज आंबेडकर, पंजाबराव वानखेडे, भदंत संघबोधीपासून स्थानिक आमदार नगरसेवक यांनी हा लढा असाच चालू ठेवावा याचे मार्गदर्शन केले. 18 मार्च 2006 रोजी अंजलीराजे दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला. याच्या सविस्तर बातम्या 8 एप्रिल 2006पासून 'तळेगाव नगरपालिकेचा ऐतिहासिक निर्णय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक होणार,' या मथळ्याखाली प्रसिध्द झाल्या. महाराष्ट्र आणि भारतातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी बातमी वाचली आणि लोक येथे येऊ लागले.
समितीच्या 8 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर कोणताही संघर्ष न करता 26 एप्रिल 2012 रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष, महसूल अधिकारी यांनी बंगल्याचा ताबा दिला. या लढ्यात अनेक मान्यवरांनी साथ दिली. त्या सर्वांचा सविस्तर उल्लेख यात आहे. ज्यांच्या सामाजिक जाणिवेतून आणि आंबेडकरी ऋण मानणार्यांमुळे हा ताबा मिळाला त्यांचा आवर्जून नामोल्लेख यात आहे. सनदी अधिकारी आर.के.गायकवाड, डॉ बबन जोगदंड, सदानंद कोचे. इ.झेड.खोब्रागडे, प्रदीप थोरात, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचा विशेष उल्लेख आहे.
आज या बंगल्यात वाचनालय आहे. आजूबाजूच्या परिसरातील 25/30 मुलं, विध्यार्थी यु. पी.एस. सी./एम. पी.एस. सी.या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. या बंगल्यात बाबासाहेबांचे दुर्मीळ फोटो आहेत.दीक्षाभूमीची लाकडी प्रतिकृती आहे. बाबासाहेब वापरत असणारे लाकडी कपाटआहे. थायलंड येथून दानस्वरूपात मिळालेली 250 किलो वजनाची बुद्धमूर्ती आहे. आवारात डॉ. बाबासाहेब आणि महामाता रमाई यांचा अर्धाकृती पुतळा आहे. बंगल्यात कमालीची स्वच्छता आणि शांतता आहे. मी, माझी पत्नी, मुलगा सहकुटुंब आम्ही भीमाकोरेगावाहून परत येताना याच बंगल्यात थांबलो, धन्य झाल्यासारखं वाटलं, ऊर आनंदाने भरून आलं.
किसन थुल यांनी लिहिलेल्या 'लढा बाबासाहेबांच्या बंगल्याचा.' या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2014 साली प्रकाशित केल्यानंतर अवघ्या सात वर्षांत या पुस्तकाची आठवी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. यावरून पुस्तकाचं यश लक्षात येतं. पुस्तकाची मांडणी अगदी साधी आहे, सर्व प्रसंग आणि घटना लेखकाने सोप्या भाषेत मांडल्या आहेत, महत्वाचं म्हणजे मी अथवा कुणी एकट्याने हे काम केलं असा कुठेही उल्लेख नाही. या पुस्तकाच स्वागत झालं आहे, हे पुस्तक आपल्या संग्रही असलेच पाहिजे. कारण यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जमीन घेतल्यापासूनच्या नोंदी आहेत. ताबा दिल्या घेतल्याची पावती आहे, मालमत्ता पत्रक गाव नमुना 7 7अ व 12 हक्काचे पत्र जसेच्या तसे छापले आहे. मुखपृष्ठावरील बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला हे खास आकर्षण आहे. किसन थुल यांनी सर्व माहिती संकलित करून वाचकांपर्यंत पोहचवली आहे.
-प्रदीप जाधव
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.