मुद्रांक शुल्कावरील दंड, व्याज सवलतीची अभय योजना १ एप्रिलपासून लागू होणार पृथ्वीराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सांगली, दि. ३० : सर्व प्रकारच्या जमीन दस्तऐवजासाठीच्या मुद्रांक शुल्कावरील चारपट दंड आकारणीऐवजी सवलतीची ची अभय योजना महसूल खाते दि. १ एप्रिल, २०२२ पासून नव्याने लागू करणार आहे. ही योजना १ एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत लागू राहणार आहे.
ही योजना मंजूर व्हावी, यासाठी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी जुलै २०२१ मध्ये महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन पत्र दिले होते, तसेच सातत्याने पाठपुरावा केला होता.
या योजनेमुळे गुंठेवारी, म्हाडा, सिडको अशा सर्व ठिकाणी नोंद झालेल्या आणि होणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील दंड व व्याजात ९० टक्के सवलत मिळणार असून, केवळ १० टक्केच रक्कम भरावी लागणार आहे.
यासंदर्भात आज श्री. पाटील यांनी मंत्रालयात महसूल मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता १ एप्रिलपासून ही अभय योजना लागू होणार असल्याचे समजले.
या निर्णयाची माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, सर्व प्रकारचे दस्ताऐवज नोंदणी करून घेत असताना मुद्रांक शुल्क व चौपट दंड आकारला जात होता, त्यामुळे सात - बारावर नाव लावण्याकरिता करावी लागणारी नियमितीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी लोक पुढे येत नव्हते, ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी पूर्वी सुरू असलेल्या अभय योजनेचे पुनर्जीवन करून ती पुन्हा सुरू करण्यात यावी. ते करत असताना मुद्रांक शुल्कावर चौपट दंड न आकारता सवलतीची अभय योजना लागू करावी, अशी मागणी आपण केली होती. नवी अभय योजना त्याच पद्धतीने लागू करण्यात आली आहे, ही योजना ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंतच लागू राहणार असल्यामुळे नागरिकांनी त्याचा वेळीच लाभ घ्यायला हवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.