आता शरद पवार करणार यूपीएचं नेतृत्व? अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव झाला मंजूर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज दिल्लीत संपन्न झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भारतातील सध्याच्या कठीण राजकीय काळात शरद पवार यांना काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी संसदीय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आजच्या तारखेत देशातील सर्व बिगर-भाजप राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना एकत्र आणण्यात शरद पवार हे मोठी भूमिका बजावू शकतात.''
या बैठकीत मेहबूब शेख यांनी शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अध्यक्ष म्हणून निवडावे हा प्रस्ताव मांडला. जो एकमताने मंजूर झाला आहे. दरम्यान, देशात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातच सत्ता असलेल्या पंजाबलाही काँग्रेसला गमवावे लागले आहे. या निडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या मागणीने जोर धरला होता. आता यातच संयुक्त पुरोगामी आघाडीची जनक असलेल्या काँग्रेसलाच यूपीए अध्यक्षपद सोडण्याची मागणी मित्र पक्ष करताना दिसत आहेत. सध्या यूपीए अध्यक्षपद हे सोनिया गांधी यांच्याकडे आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंजूर केलेल्या प्रस्तावावर काँग्रेस नेते काय प्रतिक्रिया देतील हे पाहावं लागले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.