प्रेमविवाह केला म्हणून मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क संपत नाही; गुजरात हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयाने एका मृत व्यक्तीची मालमत्ता त्याच्या मुलीकडे तात्काळ हस्तांतरित करून तिच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या मुलीच्या प्रेमविवाहाला तिच्या कुटुंबीयांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. तिच्या प्रेमविवाहामुळे नातेवाईक तिची संपत्ती काढून घेऊ शकतात, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली. मुलीने प्रेमविवाह केला आहे, या कारणावरून तिचा तिच्या वडिलांच्या संपत्तीवरील हक्क संपत नाही. अशा प्रकरणात मालमत्तेवरील मुलीच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे, असा महत्वपूर्ण निकाल गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे.
प्रेमविवाहामुळे मुलीला दर्जेदार जगण्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही
प्रेमविवाहाच्या प्रकरणांत मालमत्तेवरील मुलीच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे, अन्यथा जीवनसाथीची निवड करण्याचा तिचा घटनात्मक अधिकार तिला परिपूर्ण आणि दर्जेदार जीवन देऊ शकत नाही, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयाने स्थानिक पोलीस आणि विधी सेवा प्राधिकरणाला या प्रकरणातील मुलीच्या नावावर तिच्या मृत वडिलांची मालकी असलेली दोन घरे, एक दुकान आणि एक शेतजमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले.
प्रेमविवाहाला घरच्यांनी केला होता विरोध
हे प्रकरण साबरकांठा जिल्ह्यातील प्रांजतीज तालुक्यातील आहे. या प्रकरणातील 24 वर्षीय तरुणीच्या वडिलांचे डिसेंबर 2021 मध्ये निधन झाले. तरुणीच्या कुटुंबातील सदस्य त्यांनी निवडलेल्या तरुणाशी लग्न करण्यास सांगत होते. परंतु तरुणीने त्याच गावातील रहिवासी असलेल्या तिच्या प्रियकराशी फेब्रुवारीमध्ये लग्न केले. यातून तरुणीने घरच्यांची नाराजी ओढवून घेतली. याच रागातून तरुणीच्या मामाने तिच्या पती आणि सासऱ्यांना मारहाण केली व तरुणीला पळवून नेले. त्यानंतर तरुणीच्या पतीने पत्नीला ताब्यात घेण्यासाठी अधिवक्ता भुनेश रुपेरा यांच्यामार्फत गुजरात उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली.
न्यायालयाच्या आदेशानंतर तरुणीला कोर्टात केले हजर
न्यायालयाच्या निर्देशानंतर बुधवारी तरुणीला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी तरुणीने तिची अडचण सांगितली. तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले, तर डिसेंबरमध्ये वडील वारले. त्यानंतर घरचे इतर नातेवाईक तिच्या लग्नाच्या विरोधात होते. त्या नातेवाईकांनी तिच्या वडिलांची मालमत्ता ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तरुणीचे हे म्हणणे न्यायमूर्ती सोनिया गोकाणी आणि न्यायमूर्ती मौना भट्ट यांच्या खंडपीठाने ऐकून घेतले. त्याची गंभीर दखल घेताना न्यायालयाने प्रेमविवाहाच्या बाबतीत महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. वडिलांच्या मालमत्तेवरील मुलीच्या अधिकारांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. तरुणीचा प्रेमविवाह हा तिला दर्जेदार जीवन जगण्यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे न्यायालय म्हणाले. याचवेळी न्यायमूर्तींनी सरकारी वकिलाला प्रांतीज पोलिस ठाण्याशी समन्वय साधून तरुणीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेची आवश्यक कागदपत्रे व मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने चाव्या मिळवून देण्यास सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.