पटोलेंचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात; उकेंच्या वडिलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
मुंबई : नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यातच आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले असल्याची माहित समोर येत आहे. आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली होती. त्यानंतर आता तब्बल ५ तासांच्या छाप्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
सतीश उके यांच्या घरी ईडीच्या पथकाने आज पहाटे हा छापा टाकला होता. नागपूर येथील त्यांच्या घरी छापा मारण्यात आला. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते. ईडीने अॅड. सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उकेंच्या वडिलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.
सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर उके यांचे वडील व बंधू यांनी माध्यमांशी संवाद साधला. उके यांचे वडील व बंधू यांनी, वकील उके यांच्यावर ईडीने केलेली कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप केला. उके यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केसेस दाखल केल्या असल्याने फडणवीसांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला. तसेच उके यांचे मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले असून यामागे फडणवीस यांच्याविरोधात जमवलेले पुरावे मिटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप उकेंच्या बंधूनी केला आहे.
काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन आपल्या नावावर केल्याचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दिली होती. अॅड. सतीश उके नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता मात्र ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. आज ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.