बँकांचे सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात; घोटाळ्यांमुळे दररोज १०० कोटींचे नुकसान
नवी दिल्ली : मागील सात वर्षांपासून बँक घोटाळ्यांतील रक्कम कमी कमी होत असली तरी भारताला दररोज १०० कोटी रुपये या घोटाळ्यांमुळे गमवावे लागत आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातील बँकांत सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यात अडकलेल्या एकूण पैशांपैकी ५० टक्के पैसा महाराष्ट्रातील बँक शाखांतील आहे. त्याखालोखाल दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत मिळून दोन लाख कोटी रुपये बँक घोटाळ्यात अडकले आहेत. देशातील एकूण बँक घोटाळ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ८३ टक्के आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत देशात २.५ लाख कोटी रुपयांचे बँक घोटाळे उघडकीस आले आहेत. वित्त मंत्रालयाने म्हटले की, घोटाळ्यांची तत्पर माहिती आणि प्रतिबंध यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी घोटाळ्यातील रक्कम कमी कमी होत आहे.
घोटाळ्याचे अनेक मार्ग
रिझर्व्ह बँकेने घोटाळ्यांची ८ प्रकारांत विभागणी केली आहे. हे घोटाळे बनावट साधने वापरणे, खात्यात फेरफार करणे, खोटी खाती तयार करणे, मालमत्तांचे रुपांतरण, अवैध कर्ज सुविधा, अवैध वरदहस्त, हलगर्जीपणा, फसवणूक, बनावट दस्तावेज, विदेशी चलन व्यवहारांतील अनियमितता अशा अनेक मार्गांनी करण्यात आले आहेत.
असे बुडाले पैसे
२०१५-१६ ६७,७६० कोटी रुपये
२०१६-१७ ५९,९६६.४ कोटी रुपये
२०१९-२० २७,६९८.४ कोटी रुपये
२०२०-२१ १०,६९९.९ कोटी रुपये
२०२१-२२ ६४७.९ कोटी रुपये
(पहिले ९ महिने)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.