मतदार नोंदणी पंधरवड्यात अधिकाधिक तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 31, : तृतीय पंथीयांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती व्हावी त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तृतीय पंथीयांच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य, राहण्यासाठी स्वत:चे हक्काचे घर, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तृतीय पंथीसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी मागणीबाबतचे सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावेत. त्याचबरोबर त्यांच्याबाबतचा समाजातील दृष्टीकोन बदलण्यासाठी शालेय स्तरावर व्याख्यान मालांचे आयोजन करण्यावर भर देण्यात यावा. तृतीय पंथी ओळख दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात दि. २७ मार्च ते १० एप्रिल २०२२ हा तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करून अधिकाधिक तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकूल, समाज कल्याण निरीक्षक कल्याणी दैठणकर, मुस्कान संस्थेचे सचिव सुधीर पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, तृतीयपंथी यांना आत्मनिर्भर करण्यासाठी व त्यांना स्वत:चा व्यवसाय करता यावा यास्तव कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्यासाठी कोर्सचे आयोजन करण्यात येईल. यासाठी डीपीसीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. त्याचबरोबर व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठीही बँकांबरोबर समन्वय साधण्यात येईल. शहरी व ग्रामीण भागातील तृतीय पंथीयांची संख्या निश्चित करून त्यांना हक्काचे घरकूल मिळावे यासाठी शासनाच्या विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून घर देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभही व धान्यही उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. तृतीय पंथी हे समाजातील एक घटक असून त्यानांही मतदानाचा अधिकार लोकशाहीत आहे.
३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिनानिमित्त शुभेच्छा देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नोव्हेंबर 2021 मधील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेमध्ये सांगली जिल्ह्यात सांगली शहर व मिरज शहर येथे तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित केली होती. या मोहिमेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये 27 मतदारांची नोंदणी केली आहे. या नोंदणीसाठी सांगली मधील मुस्कान संस्थेने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मतदार यादीमध्ये एकूण 93 तृतीयपंथी व्यक्तींची नोंदणी झाली आहे. मुस्कान संस्थेच्या माहितीप्रमाणे संस्थेच्या पोर्टलवर 114 व्यक्तींची नोंदणी आहे. तर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे 172 व्यक्तींची माहिती आहे. उर्वरीत पात्र मतदारांची नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर म्हणाले, तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची कमतरता लक्षात घेवून भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत दिली आहे. 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीय पंथीव्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही नमुना पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधीत व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुद्धा पुरावा ग्राह्य धरला जातो. जिल्ह्यातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे जिल्हा निवडणूक कार्यालयाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते राखी घोंगडे, सारा वनखंडे, श्रीराम मलमे, सागर रेपे, विनायक कांबळे, विकास कांबळे, गायत्री गडकरी यांना मतदान ईपीक कार्डाचे वितरण करण्यात आले. तर जॉनी पीटर, ज्योती घोंगडे, दिपा माने यांना नविन मतदार नोंदणी फॉर्म क्रमांक 6 चे वितरण करण्यात आले.
यावेळी मुस्कान संस्थेचे सचिव राजेंद्र उर्फ सुधीर पाटील यांनी तृतीय पंथी यांच्या समस्या मांडल्या. तर तृतीय पंथी न्यूज रिपोर्टर सोनल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.