राज्यपालांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया; म्हणाले, 'तुमच्या 'चहा'छाप सैनिकांनी.'
मुंबई : औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी बोलताना कोश्यारी यांनी म्हटलं की, चाणक्याविना चंद्रगुप्तांना कोण विचारेल? समर्थांविना शिवाजी महाराजांना कोण विचारणार? असं राज्यपालांनी म्हटलं आहे. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे, असंही ते म्हणाले होते. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांसह भाजपवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात अमोल मिटकरींनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, 'राज्यपाल महोदय महाराष्ट्राची माफी मागा. तुम्ही व तुमच्या जवळ रात्रंदिवस चहा प्यायला बसणाऱ्या तुमच्या 'चहा' छाप सैनिकांनी जो वेळोवेळी 'छत्रपती शिवाजी महाराजांचा' अपमान चालवलाय ते महाराष्ट्र कधीच खपवुन घेणार नाही. माफी मागा', असे मिटकरी म्हणाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.