सर्व्हर डाऊन शासकीय कार्यालयात जनतेची हेळसांड कधी थांबणार? रावसाहेब जिनगोंडा पाटील
सांगली दि. १८ : महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कामकाजाचे संगणकीकरण करुन कामकाज सुरू केले खरे परंतु या संगणकीकरणाचा जनतेला खरोखर किती फायदा होतो.. वेळेत कामे होतात का.. शासकीय कार्यालयात जनतेची जी सनद लावली आहे त्या कालावधीत जनतेला न्याय मिळतो का याची आता शासनस्तरावर गांभीर्याने दखल घेऊन ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी तातडीने शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, आयटी सेल व महसूल विभागाने त्वरित पावले उचलून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार व सांगली जिल्हाध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी मुख्यमंत्री मा.ना उध्दवजी ठाकरे व महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे केली आहे. मिरज जि. सांगली येथील दस्त नोंदणी उपनिबंधक कार्यालयात सर्वर डाऊन या कारणाने लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष करून मालमत्ता खरेदी विक्री नोंदणी कार्यालयात दस्त नोंदणी कामी वारंवार सर्व्हर डाऊन झाल्याने जनतेला दिवस दिवसभर ताटकळत बसावे लागते. परगावाहून आलेल्या लोकांना खूप त्रास होतो. पुन्हा पुन्हा शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे हकनाक वेळ व पैशाचा भुर्दड पडतो. याचा स्वतःलाच अनुभव काल त्यांनी घेतला. सर्वर डाऊन या समस्येवर तातडीने शासनाने उपाययोजना करुन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा अशी मागणी रावसाहेब पाटील यांनी केली आहे. बँका, पतसंस्था आणि सहकारी संस्थांनाही या समस्येचा फटका बसत आहे तसेच शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी आणि पालकांनाही परीक्षा व शिष्यवृत्ती फार्म व जात दाखला प्रमाणपत्र काढणे व पडताळणी करुन घेताना तसेच जनतेला शासकीय कार्यालयात विविध दाखले मिळवणे, रेशन कार्ड काढणे इ. कामातही सर्वर डाऊन हा प्रश्न सतावत आहे. यावर तातडीने शासनाने निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढावा यासाठी आयटी सेलची खास बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा कसा काढता येईल याचा विचार करावा असेही ते म्हणाले. हा प्रश्न निकाली काढला तर गतीमान प्रशासन या शासनाच्या उद्दिष्टाचे जनतेतून अधिक स्वागत होईल व जनतेची कामे झटपट होण्यास मदत होईल असे यासाठी ही बाब मा. मुख्यमंत्री व मा. महसूल मंत्री यांच्या निदर्शनास आणल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.