नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी रस्त्यावर
मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं जाईल. बुधवारी (23 फेब्रुवारी) ईडीने आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक केली होती.त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.
अटकेचं दाऊद इब्राहिम कनेक्शन
नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर थेट टीका करत होते. काही दिवसांपूर्वी आर्यन खान प्रकरणात त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं होतं. शिवाय वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
नवाब मलिक हे पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना (2005-06) त्यांनी अटकेतील दाऊद इब्राहिमच्या साथीदारांची मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेतली, असा आरोप केला होता. नोव्हेंबर 2021 दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यातील खडाजंगी चांगलीच रंगली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.