ब्रँड सांगली' उपक्रमाचे रविवारी उद्घाटन राजीव खांडेकर प्रमुख पाहुणे
सांगली, दि. १७ : सांगली जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ओळख अधिक व्यापक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'ब्रँड सांगली' या संकल्पनेचे उद्घाटन रविवार, दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता एबीपी माझा टीव्ही वाहिनीचे संपादक आणि सांगली जिल्ह्याचे सुपुत्र श्री. राजीव खांडेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी हे राजीव खांडेकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
'ब्रँड सांगली' च्या माध्यमातून सांगली जिल्ह्याच्या नव्या सकारात्मकतेचा हा प्रारंभ आहे. नव्या जाणिवा, अभिमान आणि अभियानाचा हा शुभारंभ आहे. नव्या क्षितिजावरील नव्या आव्हानांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख पाहुणे श्री. खांडेकर हे मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहेत. मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मार्मिक राजकीय विश्लेषण, संयत मांडणी आणि परखडपणासाठी ते ओळखले जातात. त्यांचे 'हार्ट टू हार्ट' हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांची यशस्वी वाटचाल आणि विकासाच्या दृष्टिकोनातून 'ब्रँड सांगली'बद्दलचे त्यांचे विचारही ऐकायला मिळणार आहेत.
या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी सांगलीकर प्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन 'ब्रँड सांगली'चे निमंत्रक पृथ्वीराज पाटील, प्रमोद चौगुले, उज्ज्वल साठे, अशोक घोरपडे, महेश कराडकर, जयसिंग कुंभार, आदींनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.