कपाळावर गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या
येरवडा कारागृहात कर्तव्यावर असलेल्या एका 28 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली. अमोल मुरलीधर माने असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कौटुंबिक कारणातून त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. दरम्यान त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. येरवडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, माने हे शिपाई असून त्यांना कारागृह परिसरात गार्ड ड्युटी देण्यात आली होती. रविवारी ते कर्तव्यावर असताना पहाटे साडे पाचच्या सुमारास त्यांनी सरकारी रायफल मधून स्वतःच्या कपाळावर गोळी झाडली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. येथील कर्मचाऱ्यांनी माने यांना उपचारासाठी ससून रग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. माने यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतीदक्षता विभागात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.
महिन्यापूर्वीच झाले लग्न
येरवडा कारागृहात मागील सुमारे पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या माने यांचा जानेवारीत विवाह झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते सुट्टीवर होते. आठ दिवसांपूर्वीच ते कामावर हजर झाल्याचे सांगण्यात आले. माने यांनी कौटुंबिक कारणातून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.