Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिव्यांग व्यक्ती व त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

 दिव्यांग व्यक्ती व त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन


सांगली दि. 22  : दिव्यांग व्यक्ती तसेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांची नोंदणी www.mahasharad.in या संकेतस्थळावर करणे गरजेचे आहे. याकरिता दिव्यांग व्यक्तीकडे केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्र प्रणालीअंतर्गत प्रमाणपत्र (UDID Card) असणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांकडून सदर प्रणालीद्वारे मदत करण्यात येईल त्यांना आय करामध्ये 80 जी अंतर्गत सूट असेल. तरी सदर प्रणालीमध्ये जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती व दानशुर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थानी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 मधील कलम 2 (झेडसी) अन्वये दिलेल्या परिशिष्टामध्ये दिव्यांगत्याचे 21 प्रकार विनिर्दीष्टित केलेले आहेत. दिव्यांग व्यक्तींना त्यांचे जीवन सुगम्यतायुक्त जगणे सुलभ व्हावे यासाठी विविध सहाय्यक उपकरणाची आवश्यकता असते. जेणेकरून ते  त्यांच्या दिव्यांगत्यावर मात करू शकतील व जनसामान्याप्रमाणे जीवन जगू शकतील. त्यांना दिव्यांगत्यावर मात करण्यासाठी कोणत्या सहाय्यक उपकरणांची आवश्यकता आहे हे जाणून घेण्यासाठी आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करून घेणे व त्या आधारे सहाय्यक उपकरणे निश्चित करणे आवश्यक आहे. 

 समाजातील दानशुर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगाना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. मात्र दानशुर व्यक्ती व दिव्यांग लाभार्थी यांच्यामध्ये दुवा साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या सहाय्यक साधनांची उणीव भासते. त्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींना मदत मिळवून देण्यासाठी जनजागृती अभियान राबवून दिव्यांग व्यक्ती व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांमध्ये दुवा साधण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने सामाजिक व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 11 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाशरद (MAHASHARAD Maharashtra System for Health And Rehabilitation Assistance for Divyang) या वेब बेस्ड पोर्टल अंतर्गत अभियान दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती श्री. कामत यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.