मार्चनंतर शंभर टक्के अनलॉक
मुंबई : करोना रुग्णसंख्या अशीच कमी होत गेली तर मार्चनंतर शंभर टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याचे टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिली आहे. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवा व्हेरियंट आढळल्याने टास्क फोर्सने मार्चनंतरच संपूर्ण अनलॉक करण्याची ही सावध भूमिका घेतली आहे.
दरम्यान, करोनाची तिसरी लाट ओसरत असल्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटनस्थळे, चौपाट्या, उद्याने-मैदाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. पण मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, येत्या मार्च महिन्यात राज्यातील निर्बंध शिथिल केले जातील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीसुद्धा हीच मनीषा आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा आता राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. पॉझिटिव्हिटीमध्येही घट होत आहे. शिवाय राज्यात लसीकरणही चांगल्या प्रमाणात झाले आहे. राज्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 93 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर 67 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. याबरोबरच 15 ते 18 या वयोगटातील मुलांचेही 57 टक्के लसीकरण झाले आहे. सध्याही लसीकरण चांगल्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेच राज्यातील निर्बंध कमी करण्याबाबत विचार सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर मुंबईने लसीकरणाच्या साथीने कोविडवर नियंत्रण मिळवले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईतील नागरिकांचे लसीकरण 100% पूर्ण होईल अशी आशा आहे. त्यावेळी रुग्णसंख्या पूर्ण आटोक्यात आली, तर टास्क फोर्सला अहवाल देऊन हॉटेल-समारंभ पूर्णक्षमतेने सुरू केले जाऊ शकतात, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे मुंबईत राजकीय घडामोडींनाही गती येत आहे. त्यामुळेच या महिन्याअखेरपर्यंत मुंबई पुन्हा एकदा अनलॉकच्या तयारीत आहे. मुंबईत सध्या दररोज सरासरी 500 करोना रुग्ण आढळत आहेत. हा आकडा करोनाने मुंबईत थैमान घातले होते, त्यावेळपेक्षा बराच कमी आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पूर्वपदावर येते आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, नाटयगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत फेब्रुवारी अखेरची करोना स्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
राज्यातील करोना परिस्थितीवर टास्क फोर्ससोबतही चर्चा झाली आहे. टार्स फोर्सचेही मार्च महिन्यात निर्बंध कमी करावेत, असे मत आहे. याबरोबरच केंद्र सरकारनेही राज्यांनी करोनाचे निर्बंध कमी करावेत, असे सांगितले आहे. या सर्वच गोष्टींचा विचार करून राज्यातील निर्बंध मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात शिथिल केले जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.