Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भूमि अभिलेख विभागातील पद भरतीसाठी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याकामी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार

भूमि अभिलेख विभागातील पद भरतीसाठी अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याकामी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार


सांगली, दि. 21, : भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा भूमि अभिलेख विभागाच्या https://landrecordsrecruitment2021.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 9 ते 31 ‍डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. त्यानुसार दिनांक 31 ‍डिसेंबर 2021 अखेर ऑनलाईन पध्दतीने प्राप्त अर्जाच्या डाटाचे अवलोकन केले असता त्यामध्ये त्रुटी आढळून येत आहेत. या त्रुटींची पुर्तता करण्याकामी वरील कालावधीत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून छाननी अर्ज भरून घेण्याबाबत भूमि अभिलेख विभागाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. अशी माहिती उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश, पुणे चे कार्यालय अधीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी दिली.

ऑनलाईन स्वरुपात दिनांक 31 ‍डिसेंबर 2021 अखेर स्विकारण्यात आलेल्या एकूण 76 हजार 379 अर्जांचा डाटा भूमि अभिलेख विभागाकडे प्राप्त झालेला आहे. सदर डाटाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले. तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले. या कारणास्तव विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सुचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

छाननी अर्ज हे केवळ दिनांक 9 ते 31 ‍डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज भरलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत, अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून सदर छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या सदर अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे, असे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांच्यामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.