ढवळी येथे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याहस्ते जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
सांगली, दि. 27, : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ढवळी येथे जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना जवळच्या पोलिओ लसीकरण बुथवर नेऊन पोलिओ डोस देण्यासाठी आवाहन करून शुभेच्छा दिल्या.
ढवळी येथील कार्यक्रम प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय सावंत, वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदकुमार खंदारे, सरपंच बाळासाहेब चिपरे, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ उपस्थित होते. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य व क्रिडा समिती सभापती आशा पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील, आरोग्य अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते. याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याहस्ते पोलिओ बुथचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी उपस्थितांना पोलिओ लसीचे महत्व पटवून देवून दि. 27 फेब्रुवारी 2017 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांना पोलिओ लस मिळण्यासाठी केलेल्या सुक्ष्म नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यातील 2 लाख 41 हजार 466 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी 2 हजार 61 पोलिओ बुथ, 169 ट्रान्सिट टिम, 274 मोबाईल टीम कार्यरत ठेवण्यात आल्याचे सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.