करोना काळात भारतात करोडपती वाढले, मुंबई आघाडीवर
नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात करोना काळात देशात डॉलर मिलीयनरी म्हणजे ७ कोटी पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या करोडपतींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. त्यात सर्वाधिक करोडपती मुंबई मध्ये वाढले आहेत. मुंबईत करोना काळात वाढलेल्या करोडपतींची संख्या २०,३०० आहे. दिल्ली मध्ये ही संख्या १७४०० तर कोलकाता मध्ये १०५०० अशी आहे. हुरून च्या अहवालानुसार कोविड १९ महासाथ २०२१ मध्ये डॉलर मिलियनरींची संख्या ११ टक्के वाढून ४.५८ लाखांवर गेली आहे.
विशेष म्हणजे याच काळात खासगी किंवा व्यावसायिक आयुष्यात आनंदी असणाऱ्यांची संख्या घटली आहे. वर्षापूर्वी ७२ टक्क्यांवर असलेले हे प्रमाण २०२१ मध्ये ६६ टक्क्यांवर आले आहे. भारतात समाजात असमानता वाढत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच हा अहवाल आला आहे. ऑक्सफॅमनेही त्यांच्या अहवालात भारतात अतिश्रीमंत आणि अतिगरीब यांच्यातील दरी वाढत चालल्याची चिंता व्यक्त केली गेली होती आणि त्यानंतर अतिश्रीमंत लोकांना जादा कर लावला अश्या मागणीने जोर धरला होता. मात्र नव्याने करोडपती यादीत गेलेल्या लोकांपैकी १९ टक्के लोकांनी त्यांच्या संपत्तीचा काही भाग समाजाला परत केला गेला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
नवश्रीमंत यादीतील २/३ लोकांनी त्यांच्या मुलांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी पाठविण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यात अमेरिकेला प्राधान्य दिले आहे. १/४ लोकांनी मर्सिडीज बेन्झ त्यांची आवडती कार असून दर तीन वर्षांनी कार बदलत असल्याचे सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.