Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीचे सुपुत्र रोमित चव्हाणसह दोन जवान शहीद..

 सांगलीचे सुपुत्र रोमित चव्हाणसह दोन जवान शहीद..


जम्मू-कश्मीरात दहशतवादी कारवाया सुरूच असून शोपियान जिल्हय़ात चकमकीत रोमित तानाजी चव्हाण आणि संतोष यादव हे दोन जवान शहीद झाले. शहीद जवान रोमित चव्हाण हे सांगली जिल्हय़ातील वाळवा तालुक्यातील शिगावचे सुपुत्र आहेत. दरम्यान, शोपियानमधील चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.

शोपियान जिल्हय़ातील झेनपोरा भागात चेरमर्ग गावात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलास मिळाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी चेरमर्ग गावाला वेढा टाकला. कसून तपासणी सुरू केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचे जवान रोमित तानाजी चव्हाण आणि संतोष यादव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने श्रीनगर येथील 92 बेस लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. दोघांना वीरमरण आले. दरम्यान, चेरमर्ग आणि परिसरात लष्कर आणि सीआरपीएफने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली.

जवान रोमित तानाजी चव्हाण (वय 24) यांना विरमरण आल्याचे वृत्त समजताच वाळवा तालुक्यावर शोककळा पसरली. शिगावसह परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. शहीद जवान रोमित हे पाच वर्षांपूर्वी मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते. मध्यप्रदेशात सागर येथे एक वर्षाचे लष्करी प्रशिक्षण झाले. एक वर्षापूर्वी शहीद रोमित चव्हाण यांची जम्मु-काश्मिरात राष्ट्रीय रायफल्समध्ये पोस्टिंग झाली होती. शहीद रोमित यांचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू सहकारी साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे. तर लहान बहिण शिक्षण घेत आहे. उद्या (दि. 20) सायंकाळपर्यंत शहीद जवान रोमित चव्हाण यांचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.